प्रासंगिक प्रसाद पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न
ठाणे (प्रतिनिधी)
मन आणि हृदय आनंदाने भरून येणारा एक कार्यक्रम संपन्न झाला. निमित्त होतं प्रसाद सदाशिव कुळकर्णी यांच्या पहिल्या वहिल्या ललित लेखसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचं. संवेदना प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला हा ललित लेखसंग्रह पाहताक्षणी, वाचण्यापूर्वी त्या पुस्तकाच्या प्रेमात पडायला लावणारे वैचारिक व प्रासंगिक लेखन या पुस्तकात पहावयास मिळते हे महत्त्वाचे.
या पुस्तकाला प्रस्तावना व्यासंग प्रतिभा आणि शब्दकळा यांचा त्रिवेणी संगम ल्यालेली ज्ञानदा अर्थात विदुषी धनश्री लेले यांनी दिलेली आहे. प्रासंगिक प्रसादच्या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभले होते, ज्येष्ठ पत्रकार – नाटय समीक्षक – लेखक, श्री संजय डहाळे, तर प्रमुख पाहुणे होते, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक, संगीतकार श्री प्रदिप धोंड. हा सोहळा दहिसरमधील विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर शाळेतील भाई सुर्वे सभागृहात पार पडला. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५.३० ची होती.
सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची संपूर्ण जबाबदारी प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या तरल कवयित्री, voice over कलाकार तसंच साहित्य काव्य क्षेत्रातील अनेक आगळ्या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होणाऱ्या नमिता आफळे यांनी स्वीकारली होती. बरोब्बर सहा वाजता पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरवात झाली. संजयजींच्या हस्ते प्रासंगिक प्रसाद या प्रसाद कुळकर्णी यांच्या पहिल्या वहिल्या पुस्तकाचं अधिकृत प्रकाशन करण्यात आलं, आणि उपस्थित वाचक प्रेमी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने आपली मान्यता दिली.
संजयजीनी आपल्या खेळकर शैलीत भाषणाला सुरवात केली. प्रासंगिक प्रसाद या माझ्या पुस्तकातील अनेक गोष्टी, मुद्दे, त्यांना मनापासून भावलेल्या आवडलेल्या जागा, वाक्य, प्रसंग उधृत करत त्यांनी संपूर्ण पुस्तकाचा नेमका परामर्श घेतला. त्याचबरोबर उपस्थित वाचन प्रेमींना, मित्र, आप्त यांच्या वाढदिवस किंवा एखाद्या शुभ प्रसंगी त्या व्यक्तीला पुष्पगुच्छ देण्याऐवजी इतकं सुंदर पुस्तक भेट म्हणून द्या, तरच अशा पुस्तकांचा प्रसार जास्तीत जास्त वाचकांपर्यंत होईल हा महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्याचबरोबर शाळांनी सुद्धा आपल्या वाचनालयात अशा पुस्तकांना स्थान द्यायला हवं, हे फक्त सांगून थांबले नाहीत तर ते स्वतः कार्यवाह असलेल्या बोरिवलीतील चोगले हायस्कूल शाळेच्या वाचनालयासाठी या पुस्तकाची खरेदी करण्याचं आश्वासन दिलं. पुस्तकाचे प्रकाशक आणि कार्यक्रमाचे सहयजमान नितीन हिरवे यांनी प्रास्ताविक केले. उत्स्फूर्त आणि खुसखुशीत भाषण कसं असावं याचा वस्तुपाठ सादर करत नितिनजीनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रदिप धोंड यांनी अगदी आपलेपणाने थोडक्यात आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रसाद कुळकर्णी यांच्या ज्येष्ठ भगिनी शशिकला मुझुमदार यांनी सुरेख शब्दात आपल्या शब्दरूपी शुभेच्छा दिल्या तर मनीषा जोशी यांनी पुस्तकातील एका उताऱ्याचे वाचन केले.
प्रसाद कुळकर्णी यांच्या हृदयापासूनआलेल्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे उत्तम व्यवस्थापन प्रभास कुळकर्णी यांनी केले.





