देवगड हायस्कूल मध्ये इंग्लिश डे उत्साहात साजरा
देवगड (स्वप्नील लोके) दि ३ फेब्रु २०२४
देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल मध्ये इंग्रजी विषय समितीमार्फत इंग्लिश भाषेचा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून देवगड येथील कुशल अकॅडमी चे अध्यक्ष जयंत मणेरकर, शाळेचे पर्यवेक्षक सुनील घस्ती पालक दिलीप कदम विषय समिती प्रमुख संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मणेरकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. इंग्रजी विषय समितीमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
” विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवगत करणे आवश्यक आहे व ती विकसित करण्यासाठी संदर्भ ग्रंथांचे वाचन होणे आवश्यक असल्याचे” मत मणेरकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक सुनील घस्ती यांनी इंग्रजी विषय समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी दिलीप कदम यांनी देखील आपल्या मनोगता मध्ये विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमध्ये संभाषण करण्याचा सराव करण्याचे आवाहन केले.
याच दिवशी दुसऱ्या सत्रामध्ये इंग्रजी भाषेमधून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये इंग्रजी कविता, संभाषण, कथा, भाषणे आणि विविध व्यक्तीरेखा साकारलेला कार्यक्रम सादर केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन विद्यार्थ्यांनीच सादर केले होते. यामध्ये सारा खान, लावण्या हिर्लेकर, अनुष्का पोकळे, तन्मय भांडारी, स्नेहा नागरगोजे प्रांजली कानेटकर भाग्यवी खडपकर, स्वरा भुजबळ, जुबीन खान, शिवानी मेस्त्री, शुभ्रा धुरत यांचा समावेश होता.
प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रमाचे निवेदन अजित सुरुंगले तर आभार विषय समिती प्रमुख संतोष चव्हाण यांनी केले. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेच्या स्थानीय समितीचे सदस्य मिलिंद कुबल आणि सदस्य अनुश्री पारकर उपस्थित होते.





