श्री रामलल्लाच्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर विजयदुर्गच्या दर्या बुरुजाची भरणी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचा सकारात्मक उपक्रम

20

श्री रामलल्लाच्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर
विजयदुर्गच्या दर्या बुरुजाची भरणी
किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचा सकारात्मक उपक्रम

विजयदुर्ग (प्रतिनिधी)

२२ जानेवारी, तोच मुहूर्त १२ वाजून २९ मिनिटांचा. अयोध्येमध्ये श्रीरामलल्ला विराजमान होत होते. तिकडे अयोध्यानगरी सजली होती. देशभरात रामनामाचा गजर होत होता. अगदी तसाच विजयदुर्गाच्याही राम मंदिरात रामनामाचा गजर चालला होता. याच मुहूर्तावर किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव
समितीच्या सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आणि त्याची मुहूर्तमेढही रोवली. किल्ले विजयदुर्गच्या दक्षिणेकडील दर्या बुरुज आणि गणेश बुरुज हे समुद्राच्या लाटांनी आतूनपोखरले गेले आहेत. त्यातील एक दर्या बुरुज त्याच्याच निखळलेल्या चिऱ्यांनी परत भरण्याची मोहीम फत्ते केली.

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या, आंग्रे घराण्याच्या आरमारी साम्राज्याचे मुख्य ठाणे असलेला किल्ले विजयदुर्ग म्हणजे तब्बल १०५ वर्षे मराठ्यांची अनभिषिक्त राजसत्ता असलेला हा अभेद्य किल्ला. जो कोणालाही कधीही सर करता आला नाही. शिलाहार राजा भोजच्या काळात बांधला गेलेल्या या किल्ल्याला शिवछत्रपतींनी दुहेरी तटबंदी करून तो अधिक अभेद्य केला. इ. स. २००५ साली या किल्ल्याचा अष्टशताब्दी वर्ष महोत्सवही मोठ्या दिमाखाने साजरा झाला. तद्नंतर महोत्सव समितीचे रुपांतर
प्रेरणोत्सव समितीत होऊन या समितीने अनेक उपक्रम आपल्या हाती घेतले.

यातीलच एक उपक्रम श्रीरामलल्लाच्या पुर्नप्रतिष्ठापनेच्या शुभमुहूर्तावर घेतला गेला.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाशी सकारात्मक भूमिका ठेऊन दर्या बुरुजाचे निखळलेले चिरे पुनर्स्थापित करण्याचा हा उपक्रम समितीच्या सदस्यांनी अत्यंत लिलया पार पाडला. अयोध्येत रामलल्लाच्या
प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आणि ओहोटीची वेळ ही अत्यंत साधून आली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बलभीम मारुतीजवळ समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर आणि सर्व सदस्यांनी श्रीफळ ठेवून पारंपरिक गाऱ्हाणे
घातले आणि ढोलताशांच्या गजरात दर्या बुरुजाकडे सर्व ग्रामस्थांना एकत्रित घेऊन मोहिमेकडे कूच केली.तशीही मोहीम सोपी नव्हती. पण श्रीरामासाठी सेतू बांधणाऱ्या मारुतीरायाचे आशीर्वाद आणि
शिवछत्रपतींची प्रेरणा सर्वांच्याच अंगी दाटली होती. पारई, मोठे दोरखंड, लाकडी ओंडके इतकीच काही ती मोजकी सामग्री. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा ललकाऱ्या देत सर्व बळ एकवटून दर्या बुरुजाचा निखळलेला एकेक चिरा पुनर्स्थापित होऊ लागला आणि
समितीसह ग्रामस्थांनी केलेला मनोदय पूर्णत्वास गेला.
या मोहिमेचा उद्देश इतकाच की, सुमारे आठ शतकाहून अधिक समुद्री लाटांच्या तडाख्यांना तोंड देत उभा असलेल्या या किल्ल्याच्या समुद्राकडील बुरुज, तटबंदी हळू हळू शेवटचा श्वास घेत आहेत,त्याकडे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, केंद्र आणि राज्यशासन यांचं लक्ष वेधणे. ही मोहीम करताना समितीने पुरातत्व खात्याचे कोणतेही नियम यांना किंचितही तडा न जाऊ देता सकारात्मक दृष्टीने कार्य केले आहे. या मोहिमेमुळे विजयदुर्ग वासियांच्यात एक वेगळी प्रेरणा आणि चैतन्य प्राप्त झाले आहे.
या मोहिमेमध्ये किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, उपाध्यक्ष शरद डोंगरे,सचिव बाळा कदम, गणेश मिठबावकर, दिनेश जावकर, पंकज पुजारी, विजय तांबे, विजय गावकर,
सुर्यकांत तिर्लोटकर, विकास गावकर, मिलिंद डोंगरे, अमित डोंगरे, कुणाल गावकर,
शशिकांत जावकर,विशाल पुजारी, प्रदीप डोंगरे, प्रमोद डोंगरे, संकेत तिर्लोटकर यांसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.