महाराष्ट्राच्या कुमार व मुलींची विजयी सलामी;दोन्ही संघाचे विदर्भवर दणदणीत विजय

21

महाराष्ट्राच्या कुमार व मुलींची विजयी सलामी;दोन्ही संघाचे विदर्भवर दणदणीत विजय

बेमेतरा (छत्तीसगड), दि २६ डिसेंबर, 
महाराष्ट्राच्या कुमार व मुली संघाने विदर्भावर मात करीत ४२व्या कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत विजयी सलामी दिली.

बेमेतरा (छत्तीसगड) येथील अलॉन्स  पब्लिक स्कूल बिजाभटच्या मैदानावर मंगळवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी विदर्भवर २४-२० असा एक डाव राखून चार गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदे (३.१० मि. संरक्षण व ४ गुण ) व संध्या सुरवसे ( ३, नाबाद २.४० मि. संरक्षण) यांनी अष्टपैलू खेळी केली. सुहानी धोत्रे व प्रणाली काळे यांनी प्रत्येकी सहा गुण मिळवत  संघाचा विजय डावाने सुकर केला. विदर्भकडून कृतीकाने सहा गुण मिळवताना १.५० मिनिटे संरक्षण करत एकाकी लढत दिली.

कुमार गटात महाराष्ट्राने विदर्भचा ३८-२६ असा १२ गुणांनी पराभव केला. मध्यंतरासस महाराष्ट्राने १८-१२ अशी सहा गुणांची निर्णायक आघाडी घेतली होती. महाराष्ट्राच्या  चेतन भिका व तेजस जाधव यांनी आपल्या धारदार आक्रमणात प्रत्येकी दहा गुण वसूल करत संघाचा मोठा विजय निश्चित केला. वैभव मोरे (२.२०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण ) व गणेश बोरकर (२ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू  खेळ करताना महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली. विदर्भकडून के. अमनने (१.१०, १.३० मि. संरक्षण व ४ गुण) व सुमितने ( सहा गुण) चांगली लढत दिली.