चेन्नई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता अल्लू बाबत एक बातमी समोर आली आहे. अल्लूने दारू आणि पान ब्रँडची करोडोंची ऑफर नाकारल्याचे बोलले जात आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, जेव्हा जेव्हा पुष्पा चित्रपटात धूम्रपान करतो किंवा दारू पितो तेव्हा पान ब्रँडच्या विक्रेत्यांना त्यांच्या ब्रँडचा लोगो स्क्रीनवर दाखवायचा होता. या ब्रँडने चित्रपटाच्या निर्मात्यांना 10 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, परंतु अल्लू अर्जुनने ही ऑफर नाकारली. तो अशा ब्रँडचे समर्थन करणार नाही, असे अल्लूने सांगितले.
अल्लूने असे पहिल्यांदाच केले असं नाही त्याने यापुर्वीही जाहिरातीच्या ऑफर नाकारल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाच्या यशानंतर त्याला एका तंबाखू कंपनीने टेलिव्हिजनवर जाहिरात करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळीही करोडोंच्या जाहिरातीला अल्लूने नकार दिला.
‘पुष्पा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट सुकुमारच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. ‘पुष्पा: द राइज’ 2021 मध्ये रिलीज झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला. अल्लू अर्जुनला या चित्रपटासाठी नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आता चाहते अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. ‘पुष्पा 2’ मधील अल्लूचा लूक समोर आला आहे ज्यात त्याने साडी , बांगड्या, दागिने घातले आहेत. ‘पुष्पा 2: द रुल’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. त्याबरोबरच साई पल्लवी देखील पुष्पा 2 मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहे.





