सावंतवाडी : येथील बाजारपेठेत संत गाडगेबाबा भाजी मंडई बांधली जात आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु जो पर्यत स्थानिक भाजी विक्रेते, दुकानदार, फुल विक्रेते आदी व्यापार्यांचे पुर्नवसन होत नाही तोपर्यंत नाहक श्रेय घेण्यासाठी कोणी घाई गडबडीत भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे.
दरम्यान नव्या बांधकामामुळे बाधित होणार्या सर्व विक्रेत्यांनी आपली भेट घेतली असून लता लाॅज येथील दुर्गामाता पूजन होत असलेल्या ठिकाणी आपली तात्पुरती बसण्याची व्यवस्था करावी. तसेच आंब्याच्या हंगामात बाजारपेठेत बसण्याची मुभा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली असल्याचे सांगितले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते.
परब म्हणाले, मी नगराध्यक्ष असताना सावंतवाडी शहरातील भाजी मंडईच्या जागेत नवीन व्यापारी संकुल मंजूर झाले आहे. यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्यासह आपण ही प्रयत्न केला. आज नव्या इमारतीचा आराखडा मंजूर झाला आहे. त्यावर माझी सही आहे. याचा मला अभिमान आहे. हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच घाई गडबडीत भूमिपूजन करण्याचा कोणी प्रयत्न करू नये.
तर प्रथमतः त्या ठिकाणी असलेल्या व्यापार्याचे पुर्नवसन झाले पाहिजे. त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि नंतरच नव्याने कामाला सुरवात करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, कोणी श्रेय घेण्यासाठी हे काम घाई गडबडीत आटोपते घेण्याचा प्रयत्न करू नये. तसे झाल्यास संबधित व्यापारी विक्रेते यांच्यावर अन्याय होणार आहे. कोणाच्या पोटावर मारुन विकास नको त्यामुळे पहिले त्यांचे पुर्नवसन करा आणि नंतरच पुढील निर्णय घ्या, असे परब म्हणाले.
यावेळी उपस्थित व्यावसायिक व विक्रेते यांनी ही तीच मागणी केली. काही झाले तरी आम्हाला पर्यायी जागा दिल्याशिवाय काम सुरू करू नको अचानक काम सुरू केल्यास त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.





