अर्चना घारे यांनी शिष्ट मंडळासह घेतली शरद पवारांची भेट.! ; वेळागर प्रश्न सोडविण्यासाठी घातले साकडे.

118

सावंतवाडी  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी शिष्टमंडळासह भेट घेतली.

वेंगुर्ला तालुक्यातील मौजे वेळागर येथील पर्यटन विकास प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांची अधिकची जमीन अधिग्रहित होत आहे. अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी श्री. पवार यांना मार्ग काढण्याची विनंती केली. वेळागर येथील स्थानिक नागरिकांचा पर्यटन विकास प्रकल्पास विरोध नाही, मात्र अधिग्रहित होत असलेल्या अधिकच्या जमिनीतून शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन वगळण्यात यावी, तसेच गावठाण क्षेत्र वगळण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.

स्थानिक शेतकऱ्यांची सदर मागणी अतिशय रास्त असून याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून निश्चित तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती अर्चना घारे परब यांनी ‘महाराष्ट्र माझा’ला दिली.

यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, शेतकरी संघटनाअध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, सल्लागार भाऊ आंदुर्लेकर, गजानन गवंडी, शेखर नाईक, संजय आरोसकर, तातू आंदुर्लेकर, प्रकाश गवंडी, महेश आंदुर्लेकर, चंद्रकांत नाईक आदी यावेळी उपस्थित होते.