सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवतरणार ‘ग्रामविकासाची गंगा.!’ – राष्ट्रीय सरपंच संसद कोकण विभाग समन्वयक संतोष राणे. ; एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदेच्या कार्यशाळेत टीम सिंधुदुर्गचा संकल्प, जयगड येथे तीन दिवसीय ग्रामविकास कार्य प्रशिक्षण शिबीर संपन्न.

334

प्रा. रूपेश पाटील 

सावंतवाडी : ‘एमआयटी – स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद आणि जे. एस. डब्ल्यू’ यांच्या संयुक्त विद्यमाने जे. एस. डब्ल्यू. जयगड ता. जि. रत्नागिरी येथे रविवार दिनांक 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद’ च्या अमरावती व कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय ग्रामविकास कार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. ‘एमआयटी’ राष्ट्रीय सरपंच संसदेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून तसेच एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाश महाले तसेच जे. एस. डब्ल्यू. चे सीएसआर विभागाचे हेड श्र. अनिल दधिच यांच्या उत्कृष्ट नियोजनातून ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत अमरावती विभागातील वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय सरपंच संसदेचे पदाधिकारी तसेच कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर ठाणे, रायगड आदि जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

या तीन दिवशीय ग्रामविकास प्रशिक्षण शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय सरपंच संसदचे कोकण विभागाचे समन्वयक संतोष राणे, वाघेरी गावाचे माजी आदर्श सरपंच संतोष राणे, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील व एनजीओ संस्थांमध्ये विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या रचना देसाई हे पाच शिलेदार सहभागी झाले होते.

     

      

रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी या शिबिराचे उद्घाटन ॲड. नकुल पार्सेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे समन्वयक योगेश पाटील यांनी या कार्यशाळेचा उद्देश तसेच या तीन दिवसात आयोजित केलेल्या कार्यशाळेची एकूण रचना आणि आयोजित केलेल्या व्याख्यानातून ग्रामविकासाच्या दृष्टीने साधला जाणारा विकास या संबंधित प्रास्ताविकपर भाषणातून माहिती दिली. उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत जे. एस. डब्ल्यू. चे सीएसआर विभाग प्रमुख अनिल दधिच यांनी केले. यावेळी व्यासपीठावर सहसमन्वयक प्रकाश महाले, कोकण विभागाचे प्रमुख संतोष राणे, अमरावती विभागाचे विभागीय संघटक ॲड. मंदाकिनी पाटील, कोकण विभाग महिला संघटक वंदना रानडे, रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक प्रभाकर खानविलकर, तज्ज्ञ मार्गदर्शक राहुल देशमुख, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रकाश माने, कोकण विभागाचे समन्वयक सुहास सातार्डेकर, अमरावती विभागाचे अध्यक्ष अभय खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

      

उद्घाटन सत्र संपल्यानंतर प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले संतोष राणे ( बांबू उत्पादक व बांबू उद्योजक सिंधुदुर्ग) यांनी ‘बांबू – ग्राम विकासाचा शाश्वत स्त्रोत’ या विषयावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारा उपस्थित असलेल्या अमरावती व कोकण विभागातील राष्ट्रीय सरपंच संसदेच्या पदाधिकाऱ्यांना उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. बांबू या पिकाचा आपल्या ग्रामविकासासाठी कसा उपयोग होऊ शकतो, याबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन संतोष राणे यांनी केले.

दुसऱ्या सत्रात ‘बांबू ग्राम विकासाचा शाश्वत स्त्रोत’ या विषयावर बांबू इंडिया, पुणे या संस्थेचे संचालक योगेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
तर तिसऱ्या सत्रात ‘बांबू – ग्राम विकासाचा शाश्वत स्त्रोत’ या विषयावर अमरावतीचे बांबू उत्पादक व बांबू उद्योजक राहुल देशमुख यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

यानंतर पुढील सत्रात फार्मर्स प्रोड्युसर कंपनी निर्मिती व व्यवस्थापन याबद्दल सोलापूर येथील फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

या तीन दिवसीय ग्रामविकास कार्य प्रशिक्षण शिबिरात पुढील सत्रात वाशिम येथील तज्ज्ञ मार्गदर्शक सागर ढेरे यांनी ‘सौर ऊर्जा’ या विषयावर मार्गदर्शन करून भारत हा जगातील तिसरा ऊर्जा निर्मिती करणारा देश असल्याचे सांगितले. आपल्या भारत देशात सौर ऊर्जा हा सर्वात प्रभावी ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे उपस्थितांना सांगून सौर ऊर्जा निर्मितीसाठी शासकीय स्तरावरून असलेल्या विविध योजनांची त्यांनी विस्तृत माहिती सांगितली.

पुढील सत्रात बुलढाणा येथील तज्ज्ञ मार्गदर्शक पूनम राठोड यांनी ‘महिला सशक्तीकरण व ग्रामविकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून सर्व क्षेत्रात महिला या पुढारलेल्या आहेत. आज महिला अबला नाही तर ती सबला झाली असून ग्राम विकासाच्या स्तरावर महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. तसेच एखादी महिला सरपंच ज्या पद्धतीने चांगले काम करू शकते तसे कार्य किंबहुना पुरुषांकडूनही होणार नाही असेही गायकवाड यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघेरी गावाचे ज्येष्ठ माजी आदर्श सरपंच संतोष बाजीराव राणे यांनी केले.

या सत्राचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य सरपंच संसदेचे अमरावती विभागाचे अध्यक्ष अभय खेडकर यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा आणि एकूणच कोकण विभाग याची रचना पाहता बांबू या पिकाला शाश्वत विकासासाठी आवश्यक ते मार्गदर्शन या शिबिरातून होत आहे, हे चित्र ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड आश्वासक आहे. आगामी काळात कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामविकासाची नवी गंगा एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून आणि जे. एस. डब्ल्यू सारख्या विविध संस्थांच्या आर्थिक सहकार्यातून अवतरल्याशिवाय राहणार नाही, असा आपणास ठाम विश्वास आहे.
दरम्यान श्री. पार्सेकर यांनी या आयोजनाबद्दल एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदेचे आणि जे. एस. डब्ल्यूचे विशेष आभार मानले तसेच आगामी काळात जे जे सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य करून कोकणच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामविकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे आभार एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे सहसमन्वयक प्रकाश महाले यांनी केले.

या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी एमआयटी – स्कूल ऑफ गव्हर्नमेंट राष्ट्रीय विधायक संमेलन, भारतीय छात्र संसद आणि राष्ट्रीय सरपंच संसद’ या उपक्रमांच्या चित्रफिती दाखवून एमआयटी – स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांचे विविध विधायक कार्य याबद्दल उपस्थित मान्यवरांना माहिती देण्यात आली.

त्यानंतर ‘सीएसआर निधी संकल्पना, संकलन आणि व्यवस्थापन’ या विषयावर अमरावती येथील तज्ज्ञ नितीन राजवैद्य यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आभार अभय खेडकर यांनी केले.

या कार्यशाळेच्या पुढील सत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व बुलढाणा येथील ग्रामविकास तज्ज्ञ श्रीमती ॲड. मंदाकिनी पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व ग्रामविकास तज्ज्ञ उषा वनारे, नीता लांडे यांनी आपण आपल्यास्तरावरून केलेले ग्रामविकासंबंधी कार्य, ‘पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन’ याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच यशोगाथा या विषयावर कळमगव्हाण ग्रामपंचायत तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील आदर्श सरपंच कपिल देवके आणि धाकली ग्रामपंचायत तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला या गावाचे सरपंच महेंद्र गाढवे, तसेच तरोडा ग्रामपंचायत तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथील आदर्श सरपंच श्री. ॲड. प्रवीण कडाळे – पाटील यांनी आणि

ही आपापल्या गावाच्या यशोगाथा सांगत उपस्थितांना ग्रामविकासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी विशद केल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रभाकर खानविलकर यांनी केले

या तीन दिवशीय कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात अध्यक्षस्थानी एडवोकेट नकुल पारसेकर होते तर प्रमुख समन्वयक योगेश पाटील सह समन्वयक प्रकाश महाले जे एस डब्ल्यू चे सीएसआर प्रमुख अनिल दधिच, तज्ञ मार्गदर्शक संतोष राणी वंदना दराडे गजानन मिरगे सुहास सातार्डेकर प्रफुल्ल बानगावकर मंदाकिनी पाटील उषा वनारे महेंद्र गाढवे प्रवीण कडाळे संतोष बाजीराव राणे आदि उपस्थित होते.
यावेळी विविध मान्यवरांनी तीन दिवसात आलेल्या आपल्या अनुभवाचे कथन करून आगामी काळात ग्राम विकासासाठी आपण काय करणार याविषयी सविस्तर माहिती दिली.
या संपूर्ण तीन दिवसीय ग्रामविकास कार्य प्रशिक्षण शिबिराचे आढावा घेत उपस्थित आमचे आभार सिंधुदुर्ग येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील यांनी मांडले

सिंधुदुर्गात होणार लवकरच एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद –

दरम्यान या ग्रामविकास कार्य प्रशिक्षण शिबिराच्या शेवटी सिंधुदुर्ग किल्ला सहभागी झालेले पाचही शिलेदार यांनी मुख्य समन्वयक योगेश पाटील यांच्या परवानगीने पुढील जानेवारी महिन्यात सिंधुदुर्ग येथे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद आणि काही मदत करणाऱ्या संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सरपंचांसाठी एक दिवसीय ग्रामविकास कार्य प्रशिक्षण शिबिर घेतले जाईल असे जाहीर केले या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील दीड हजार सरपंच व रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय सरपंच संसदेचे पदाधिकारी व सरपंच सहभागी होणार असल्याचे जाहीर केले या कार्यक्रमासाठी हवे ते सहकार्य एमआयटी करणार असल्याचे मुख्य समन्वयक योगेश पाटील यांनी मान्य केले.