सावंतवाडी : दि बांदा नवभारत शिक्षण संस्थेतील, नवभारत विद्यालय, माजी शिक्षिका सौ.शोभना श्याम धुरी मॅडम यांचे अलीकडेच मुंबईत, डोंबिवलीमध्ये अकस्मात निधन झाले. त्या कुंब्रल गावातील श्री.महादेव सावंत यांच्या जेष्ठ कन्या होत्या.त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंब्रल शाळेत तर माध्यमिक शिक्षण समाज सेवा हायस्कूल कोलझर येथे झाले होते.मृत्यु समयी त्यांचे वय अवघे त्रेसष्ट वर्ष होते. सर्वप्रथम शिक्षिका म्हणून त्यांची नेमणूक कोलझर येथेच झाली होती.
त्यानंतर लग्न होऊन त्या मुंबईत आल्या,व नवभारत हायस्कूल परेल येथे निवृत्ती पर्यन्त त्यांनी जवळपास पस्तीस वर्षापेक्षा जास्तकाळ अध्यापनाचे कार्य अगदी मनांपासून व कर्तव्यदक्षतेने, प्रामाणिकपणे केले.
सुरूवातीला केवळ S.S.C. D.Ed होत्या, उत्तर आयुष्यात मात्र M.A. B.ed पर्यंत शिक्षण पूर्णकेले.एवढेच नव्हे तर त्या हिंदी ची पंडीत परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.
स्वतःच्या तीन मुलींना चांगल्या प्रकारे
सांभाळून त्यांनी अनेक गरीब-होतकरू विद्यार्थ्यांनाही कितीतरी मदत केली.सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात त्यांना उत्साह होता. ” मुलगी शिकली प्रगती झाली ” हा सुविचार त्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.” मुलगा शिकला तर एक घर उभं राहातं, याउलट मुलगी शिकली तर सासरं आणि माहेर दोन कुटुंब सुरक्षित होतात.दोन कुटुंबात आमुलाग्र बदल होतो, पर्यायाने दोन समाजात दोन गावात प्रगती होते ” हे त्यांच्याकडे बघून नक्कीच मान्य करावे लागेल.
इन्सुली धुरीवाडी येथील श्री.श्याम धुरी या सद्गृहस्थांशी तीचा विवाह झाला होता.सात भाऊ व एक बहीण एवढ्या मोठ्या कुटूंबात आजही ते एकत्र कुटुंब पद्धतीत राहात होते.त्यांना तेजस्विता, शलाका व अंकीता अशा तीन सुशिक्षित कन्या असून त्या आर्थिक व कौटुंबिक दृष्ट्या सुखी संपन्न जीवन जगत आहेत.त्यापैकी दोघींचा विवाह झालेला आहे. गेल्या पाच वर्षापूर्वीच त्या शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या व डोंबिवलीत वास्तव्याला होत्या. तीथेच दिनांक २२ रोजी पहाटे तीला देवाज्ञा झाली. त्या मध्ये मध्ये आजारी असत परंतू एवढ्या लवकर आपल्या सगळ्यांनाच सोडून जातील असं वाटलं नव्हतं.त्यांच्या निधनाचे वृत्त वा-यासारखे समाज माध्यमातून मुंबईपासून गावापर्यंत पोहोचले आणि विविध ठीकाणी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली.
ही गोष्ट श्री.दशरथ घाडी, समाज सेवा हायस्कूल कोलझर चे त्यांचे विद्यार्थी व नंतर त्यांचे सहकारी ( मडूरा हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक )यांना समजल्यावर त्यांनी फोन करून,त्यांच्या विद्यार्थी दशेतील अनेक आठवणींना उजाळा दिला.एवढेच नव्हे तर जेव्हा ते बदली होऊन बांद्यावरून मुंबईत आले तेव्हा राहण्याच्या सोयीपासून, पैशाची पण मदत केली, व जेव्हा त्यांचा मुलगा आजारी होता तेव्हा बाईंची खुप मदत झाल्याचे सांगीतले. हे फक्तमाझ्यासाठी नव्हे तर त्या अनेकांना मदत करत. त्या खुपच प्रेमळ, कनवाळू व आदरणीय अनुकरणीय होत्या असे प्रतिपादन केले.

विद्यार्थ्यांना त्या फक्त शिकवत नसत तर अनेक सहशालेय उपक्रमातून त्यांना भावी उज्ज्वल काळासाठी तयार करत असत.स्वतः गरिबीतून आल्यामुळेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांबद्दल त्यांना विशेष कणव होती. त्यांना त्या नेहमी मायेने मदत करत.आम्ही के.बी.देसाई सर व प्रतापराव तोरसकर साहेबामुळेच घडल्याची आठवण विविधकार्यक्राच्या निमित्ताने सांगत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवणे, स्कॉलरशिपचे तास घेणे, विविध स्पर्धेचा सराव घेणे हेही मनापासून करीत. तर श्रेया रेडकर म्हणजे पूर्वाश्रमीच्या प्र.ना.तेली सरांच्या कन्या यांनी त्यांची बातमी ऐकून धक्का बसल्याचे सांगीतले.व क्षणार्धात त्यांच्या सोबत काम करीत असतानाच्या अनेक आठवणी सांगितल्या. आमच्यासारख्या तरूण शिक्षकांना त्यांनी खुपच छान मार्गदर्शन केले, माझ्यासाठी तर त्या दुस-या आईच होत्या.
त्या गेली २५ वर्षे निरंकारी संप्रदायाशी जोडल्या होत्या आणि प्रचारक म्हणून कार्यरत होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला धार्मिक,सामाजिक कार्यात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक ऋणानुबंधाच्या अनेक आठवणींनी आज मन भरून आल्याचं अनेकांनी सद्दगदीत होऊन सांगीतले.दोन-तीन वर्षांच्या छोट्या मोठ्या आजारपणानंतर एक सालस,
आदर्शव्रत,सन्माननिय व्यक्तिमत्व आपल्यातून आता निघून,
पंचमहाभूतात विलीन झालयं हे जड अंतःकरणाने का होईना आज मान्य करावं लागतयं.
आपण कुठून आलोय ? या प्रश्नाचं उत्तर अगदीच सोप आहे. आईच्या गर्भातून. कुठे जाणार ? हे मात्र कुणालाच माहीत नाही.पण जन्म आणि मृत्यू दरम्यानचा प्रवास लौकिक अर्थाने त्यांनी नक्कीच यशस्वीपणे पूर्ण केलेला दिसतो.त्यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय मित्र-परिवार,सहकारी शिक्षक, ग्रामस्थ,व विद्यार्थी वर्गातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
शब्दांकन : विजय सावंत.
( माजी विद्यार्थी, नवभारत शिक्षणसंस्था.)
मोबाईल – 9987175390





