जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. सरकारला ४१ दिवस दिले होते. मात्र शिंदे समितीने काम केले नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली. संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. सराकरला खूप वेळा समजावून सांगितलं. पण ते एकनाथ शिंदे साहेबांना आडव करत आहेत. त्यांना आरक्षण देऊ देत नाहीत. तुम्ही आल्यामुळे बळ वाढलं, अशी भावना मनोज जरांगे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना बोलून दाखवली.
आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील लेकरांवर अन्याय होत आहे. आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे. आमचं काय चुकतं हे सरकारने सांगावं, असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाज माझा माय-बाप मी खोटं बोलणार नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
आधी सरकारने मुदत मागितली आता तेच म्हणतात वेळ वाढवून मागत आहेत. सरकार म्हणते नोंदी सापडत नाहीत, असं होत नसते, सरकारने काय निकष लावला हे आम्हाला समजत नाही. संभाजीराजे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, हिच आपली मागणी असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रमाणिकपणे इथं आलोय मदत लागली तर सांगा. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी स्वत: प्रयत्न केले. मी कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरुन इथं आलो नाही. वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी मी महाराष्ट्र पिंजून काढला, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहीजे. मनोज रांगडा मुलगा आहे, पण शरीर एकच असते. मला कळालं जरांगे पाटील पून्हा उपोषण सुरु केलं. त्यामुळे आज इथं आलो. आरक्षणासाठी मी प्रयत्नशील आहे. मनोज जरांगे यांनी पाणी तरी प्राशन करावं ही आमची विनंती आहे.
मनोज जरांगे स्वत:च्या कुटुंबापेक्षा समाजाला मोठं समजतो. उपोषणामुळे त्यांना चालता देखील येत नव्हत. मला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. अशा लोकांना बळ देण, ताकद देण ही छत्रपती घराण्याची जबाबदारी आहे.





