कणकवली : दिनांक १५ ऑक्टोबर डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत ग्रंथालय विभागामार्फत विद्यार्थांना वाचनाची अभिरूची निर्माण होण्यासाठी वाचन प्रेरणा व ग्रंथ प्रदर्शन हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी व अष्टपैलू अभिनेता, निवेदक निलेश पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. जे. कांबळे व माजी शिक्षिका सौ. श्रध्दा कदम यांनी केले. यावेळी निलेश पवार यांनी वाचन शक्तीचे महत्व आणि विकास यासंबंधी आपल्या भारदस्त आवाजाच्या शैलीत विद्यार्थांना मार्गदर्शन केले. वाचनाची अभिरुची बालवयातच कशी रुजते? याची विविध उदाहरणे देऊन विवेचन केले. लेखक प्रवीण दवणे यांच्या कथेचे कथाकथन निलेश पवार यांनी करून बालकांना आणि अध्यापकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे वाचन शक्ती विकसित होण्यास प्रशालेतील विद्यार्थांना चालना मिळाली. यावेळी सहाय्यक शिक्षक संदीप कदम, सौ. श्रध्दा कदम यांनी वाचन विकास आणि व्यक्तीमत्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान शिक्षिका सौ. केळुसकर मॅडम यांनी स्वरचित कवितांचे प्रकटवाचन करून श्रोत्यांची दाद मिळविली आणि स्वतःचा वाचनातून कसा विकास झाला व त्यांच्या कवितेचा जन्म याविषयी स्वकथन केले.
मुख्याध्यापक पी.जे कांबळे सरांनी वाचनशक्ती व प्रेरणा या विषयी उद्बोधन केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे ग्रंथपाल महानंद पवार यांनी केले. ग्रंथालय विभागामार्फत हस्ताक्षर स्पर्धा घेऊन विजेत्यांना ग्रंथ भेट दिली. यावेळी सौ. श्रद्धा सूर्यकांत कदम यांनी वाचनालयासाठी आपले वडील श्री. रामचंद्र कदम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ग्रंथभेट दिली. वाचन दिनानिमित्ताने प्रशालेच्या ग्रंथालयाला वाचनाची वृद्धी होण्यासाठी विध्नेश गोखले ‘श्री माऊली बुक डेपो’, श्री. गोवेकर, श्री. म्हापसेकर या मान्यवर व्यक्तीनी ग्रंथालयाला ग्रंथांची भेट देणगी देऊन उपकृत केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, पर्यवेक्षिका सौ. जाधव, केंद्रप्रमुख श्री. पवार, ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे आदि उपस्थित होते.





