नवी दिल्ली : अफगाणिस्तानने आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या १३व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून मोठा पराभव केला आहे. इंग्लंड संघाचा विश्वचषकातील हा दुसरा पराभव आहे. याआधी इंग्लंडला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. इंग्लंडला बांगलादेशविरुद्ध एक विजय मिळाला आहे. अफगाणिस्तानचा तीन सामन्यांमधला हा पहिला विजय आहे. यापूर्वी बांगलादेश आणि भारताविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४९.५ षटकांत सर्व गडी गमावून २८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४०.३ षटकांत केवळ २१५ धावाच करू शकला.
इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक ६६ धावा केल्या. त्याला मुजीब उर रहमानने बोल्ड केले. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने ३२ धावा केल्या तर जो रूट ११ धावा करून बाद झाला तर लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी १० धावांची खेळी केली. कर्णधार जोस बटलर ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आदिल रशीदने २० धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून युवा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. मोहम्मद नबीने २ विकेट घेतल्या. तर फजलहक फारुकी आणि नवीन-उल-हक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.




