मुंबई : आमदार अपात्र प्रकरणी निकाल देण्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे व शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. काल (शुक्रवार) या प्रकरणी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कडक शब्दात सुनावले. दरम्यान कालच्या सुनावणीवर राहुल नार्वेकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
“सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशासंदर्भातील प्रत माझ्याकडे प्राप्त झाली आहे. त्या आदेशात जे लिहिलेले आहे त्याचे अवलोकन केल्यानंतर जी कारवाई अपेक्षित आहे ती कारवाई केली जाईल. मात्र वेळापत्रक इतक्या दिवसात द्या आणि दोन महिन्यात निर्णय घ्या, असं कुठेही आदेशात म्हटलं नाही. त्यामुळे कोण काय म्हणत यावर मी लक्ष देत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात जे लिहिलं आहे त्याची दखल मी घेतो आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्याची कायदेशीर सल्ला मी घेत आहे”, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
राहुल नार्वेकर म्हणाले, “ज्या गोष्टींचा कोर्टाने आदेशात उल्लेख केला नाही त्या गोष्टींबाबत दखल घेणं मी योग्य समजत नाही. यापूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्या संविधानामध्ये न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ व विधिमंडळला तिघांनाही समान स्थान दिले आहे. कोणाचेही कोणावर सुप्रिटेंडन्ट नाहीये असं असताना कोर्टाचा आदर ठेवून किंवा संवेधानातून निर्माण झालेल्या इतर संस्थांचा आदर ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.” “ज्या व्यक्तीला सद्य लोकशाहीवर विश्वास आहे. तो निश्चितपणे संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचा मान राखेल. माझा संविधानावर पूर्ण विश्वास असल्यामुळे कोर्टाने दिलेल्या आदेशाचा आणि कोर्टाचा मान राखणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडणार”, असे नार्वेकर म्हणाले.
राहुल नार्वेकर म्हणाले, आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र राज्य विधिमंडळ सिद्धांत आहेत किंवा विधिमंडळाचे सार्वभौमत्व आहे ते कायम ठेवणं गरजेचे आहे. त्याचप्रमाणे न्यायिक विशेषाधिकार आहेत त्या संदर्भात पण उचित कारवाई होणं अपेक्षित आहे. या दोघांमध्येही बॅलन्स होणं हे माझं कर्तव्य आहे. प्रत्येक संविधानिक संस्थेने एकमेकांचा मान राखत काम करणं अपेक्षित आहे.






