हांगझोऊ : आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे. यामुळे भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडलीये. भारताने अंतिम सामन्यात इराणचा 33-29 असा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला. हा सामना जिंकून यंदाचा आशिया स्पर्धांमधील कबड्डीचा किताब हा भारताने गतविजेत्या इराणचा पराभव करुन आपल्या नावावर करुन घेतला आहे.
सुवर्णपदकाचे दावेदार असलेला भारत व मागील एशियन गेम्समधील सुवर्ण पदक विजेता इराण या अंतिम सामन्यात समोरासमोर आलेले. दोन्ही संघांदरम्यान अखेरपर्यंत काट्याची लढत झाली. सामना संपण्यासाठी दीड मिनिट शिल्लक असताना दोन्ही संघ 28-28 अशा बरोबरीत होते. त्यावेळी भारतीय कर्णधार पवन सेहरावत हा रेड मारण्यासाठी गेला.
मात्र तो कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता लॉबीमध्ये गेला. त्याच्यामागे अफगाणिस्तानचे चार खेळाडू देखील लॉबीमध्ये आले. त्यावेळी पंचांनी दोन्ही संघांना 1-1 गुण दिले. त्यावर भारतीय संघाने आक्षेप घेतला. त्यानंतर पंचांनी निर्णय बदलत भारताच्या बाजूने 4-1 असा निर्णय दिला. त्यावर इराणने विरोध नोंदवला. पुन्हा गुण 1-1 असे केले गेले. भारताच्या या विरोधानंतर सामना जवळपास एक तास थांबवला गेला. मोठ्या वादा नंतर पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा भारताच्या बाजूने निर्णय दिला गेलेला. अखेर उर्वरित एका मिनिटाचा खेळ पार पडला तेव्हा भारतीय संघाने 32-29 असा विजय संपादन केला. एशियन गेम्स स्पर्धेतील कबड्डीमधील हे भारताचे 8 वे सुवर्णपदक आहे.
या सामन्यात काहीसा वाद झाला त्यामुळे सामन्याला देखील विलंब झाला. पण शेवटी निर्णय हा भारताच्या बाजूने देण्यात आला. तासाभराच्या वादानंतर शेवटी खेळ पुन्हा सुरु करण्यात आला आणि भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक आले. दरम्यान भारताची आशियाई स्पर्धांमधील घोडदौड ही सुरुच आहे.
पाकिस्ताना हरवत अंतिम फेरीत प्रवेश –
पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर भारताने कबड्डीवर देखील उपांत्य फेरीत दणदणीत विजय मिळवला. भारताने 61 – 4 अशा फरकाने पाकिस्तानला चारी मुंड्या चित करत कबड्डीच्या अंतिम फेरी प्रवेश केला. दरम्यान, महिला कबड्डीच्या उपांत्य फेरीत भारताने नेपाळवर दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिलांनी 61-17 असा सरळ विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवले.
कबड्डीमध्ये महिलांची कामगिरी –
भारताच्या ‘नारी शक्ती’ने आशियाई स्पर्धेतसुवर्ण कामगिरी केली आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं आहे. चीनचा पराभव करत भारताच्या नारी शक्तीने सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने चिनी तैपेईचा चित्तथरारक अंतिम फेरीत पराभव केला. भारताने चीनचा 26-25 अशा फरकाने पराभव केला आहे. महिला कबड्डी संघाने भारताला 27 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.





