…अन् आजी- आजोबा दिवस झाले भावुक..! ; माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे वात्सल्यमय वातावरणात कार्यक्रम.!

127

देवगड : साळशी प्रशालेत ‘आजी-आजोबा दिवस’ वात्सल्यमय, भावुक व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.  प्रारंभी सर्व उपस्थित आजी -आजोबांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात उत्साहात करण्यात आली.


मुख्याध्यापक माणिक वंजारे तसेच सहाय्यक शिक्षक श्री. मराठे व साटम सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन उपस्थित सर्व आजी – आजोबा यांचे स्वागत करण्यात आले. संस्था उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर यांनी या दिवसाच्या महत्वाविषयी विचार व्यक्त केले.
मुख्याध्यापक श्री. वंजारे यांनी उपस्थित सर्व आजी-आजोबांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. आपले विचार प्रकट करताना असे दिवस साजरे करणे आवश्यक का बनले?, तसेच आपल्या आई-वडिलांसारखे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आजी-आजोबांवर व्यक्त करा, त्यांचा कधीच अपमान करू नका, तसेच त्यांना मदत करा, असे मार्गदर्शन त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.


उपस्थित आजीपैकी लक्ष्मी पवार, सुलोचना साळसकर, सरस्वती भोगले व विजया प्रभुमिराशी या आजीनी आपल्या नातवंडे व शाळेविषयीच्या आपल्या भावना मालवणीतून व्यक्त करुन सर्वाचीं मने जिंकली. या सर्वाच्यां मनोरंजनासाठी शाळेच्या विद्यार्थिनीनी सुंदररित्या सादर केलेल्या समुहनृत्यांनी आजी-आजोबांची मने जिंकली. उपस्थित सर्व आजी-आजोबांचे चरणकमल धुणे, ओवाळणे या सर्व नातवंडाच्या धार्मिक विधीनी वातावरण भारावून गेले.
यानंतर त्यांच्या मनोरंजनासाठी आयोजित संगीत खुर्चीच्या खेळाने उत्साह द्विगुणित केला. यामध्ये सुलोचना साळसकर व लता ठुकरुल या दोन्ही आजीनी संयुक्त प्रथम क्रमांक प्राप्त केला.
सदरच्या कार्यक्रमांसाठी 12 ते 15 आजी-आजोबा तसेच संतोष साळसकर, रवींद्र साळसकर आदिसह पालकांनी उपस्थिती लावली.
पुरुषोत्तम साटम यांनी सुत्रसंचालन केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.