भाषण स्वातंत्र्य ‘हेटस्पीच’ होता कामा नये.! ; ‘सनातन वादा’वर हायकोर्टाची टिप्पणी.!

27

चेन्नई : सनातन धर्मावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेटस्पीच होता कामा नये, असं विधान हायकोर्टानं केलं आहे. पण यावेळी कोर्टानं सनातन धर्म काय आहे, हे देखील सांगितलं. न्या. एन. शेषशायी यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली आहे.

कोर्टानं सांगितलं ‘सनानत धर्म’ काय?

न्यायमूर्तीं पुढे म्हणाले की, सनातन धर्म हा शाश्वत कर्तव्यांचा समूह आहे. ज्यामध्ये राष्ट्र, राजा, आई-वडील आणि गुरूंप्रती कर्तव्य आणि गरिबांची काळजी घेणे यासह इतर कर्तव्यांचा समावेश आहे. भाषण स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी, तो द्वेषयुक्त भाषणात बदलू नये. विशेषत: जेव्हा आपलं विधान धर्माशी संबंधित असेल. अशा भाषणानं कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे.

सनातनच्या तत्वांना आता जागा नाही…

“समान नागरिक असलेल्या देशात अस्पृश्यता खपवून घेतली जाऊ शकत नाही,” न्यायमूर्ती शेषशायी म्हणाले. “अस्पृश्यता पाळण्याबाबत सनातन धर्माच्या तत्त्वांमध्ये कुठेतरी परवानगी असली तरी, आता या तत्वांना समाजात जागा मिळू शकत नाही, कारण घटनेच्या कलम 17 नं अस्पृश्यता नाहीशी केली आहे.”

हेटस्पीच नको..

कोर्टानं म्हटलं, “प्रत्येक धर्म श्रद्धेवर आधारित आहे आणि स्वभावतःच श्रद्धा आंधळी असते” “म्हणून, जेव्हा धर्माशी संबंधित बाबींमध्ये भाषण स्वातंत्र्य वापरलं जातं, तेव्हा कोणीही दुखावला जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजेच दुसऱ्या शब्दांत, भाषण स्वातंत्र्य द्वेषयुक्त भाषण असू शकत नाही.”

स्टॅलिन यांनी केलं होतं वादग्रस्त विधान..

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात नुकत्याच केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं ही टिप्पणी केली आहे. त्यांनी सनातन धर्माला ‘डेंग्यू आणि मलेरिया’ सारख्या रोगांची उपमा दिली होती. त्यामुळं त्यांना या घटनेनंतर मोठ्या टीकेला समोरं जावं लागलं.