शिक्षकांचा सन्मान..! – शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. ह. ना. जगताप यांचे चिंतन…!

66

शिक्षकदिन आला की, शिक्षकांची प्रतिष्ठा, शिक्षकांचा सन्मान, शिक्षकांची गुणवत्ता, शिक्षकांचा दर्जा, शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, शिक्षकांची कर्तव्ये अशा अनेक अंगांनी वेगवेगळ्या व्यासपीठावर चर्चा होत रहाते. नुकतीच आता सौ. धुमाळ या शिक्षिकेच्या शाळेतील ६५ विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र झाले म्हणून गावकऱ्यांनी त्यांना कार भेट देऊन त्याचा सन्मान केल्याची पोस्ट व्हॉटस अप वर व्हाय रल झाली. वारे गुरुजींनी देखील आपली शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवली म्हणून त्यांचाही समाजाने सन्मान केला. शासनाचे देखील पुरस्कार जाहीर झाले आहेत. याचा अर्थ हेच शिक्षक फक्त सन्माननीय आहेत असा होत नाही.

हे अपवादात्मक शिक्षक वगळले तरीही अगदी सामान्य शाळांतील शिक्षकांचा समाजाकडून नेहमी सन्मानच होत आला आहे. परंतु तरीही शिक्षकांना उगीचच असे वाटत राहते की, समाजात आपल्याला फारशी प्रतिष्ठा नाही. वास्तविक हल्ली अत्यंत लाडकी असणारी आपली मुले जेंव्हा पालक अत्यंत विश्वासाने शिक्षकांकडे सुपूर्द करतात, हे शिक्षकच आपल्या पाल्यांचे कल्याण करणार आहेत असा त्यांचा विश्वास असतो.

समाजामध्ये आणखी एक मोठा गैरसमज आहे तो म्हणजे पूर्वीचे शिक्षण दर्जेदार होते व आता शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. आणि हे पालुपद फार पूर्वीपासून ऐकायला मिळते. जर शिक्षणाचा दर्जा घसरत चाललेला आहे हे मान्य केले तर समाजामधे होणारी प्रगती कशामुळे होत आहे याचा विचार करावा लागेल. सन १९७२ – ७३ च्या दुष्काळात आपल्या जनतेला अमेरिकन मिलो नावाचे धान्य खावे लागले होते आज आपण अन्नधान्या बाबत स्वयंपूर्ण आहोत.

पूर्वी पाश्चात्य राष्ट्रातील इंजिनिअर्सला बोलावून आपल्या येथील कामे करीत होतो. आज आपल्या येथे इंजिनिअर झालेली मुले इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर येथे नाव कमावत आहेत. छोट्या छोट्या यांत्रिक गोष्टी आपण परदेशातून मागवत होतो आज आपल्या येथे मोठमोठ्या, मशिनरी, यंत्रसामुग्री तयार होऊ लागली आहे हे शिक्षणव्यवस्थेचे यश नव्हे कां?
असे असूनही शिक्षकांनाच असे वाटते की, शिक्षकाला समाजात पूर्वी जेवढा मान होता तेवढा आता मिळत नाही. शिक्षकांनी आपल्या मनातील हा न्यूनगंड दूर करावा व आपल्या देशाच्या विकासाचे आपण हक्कदार आहोत ही भावना मनात
दृढ करावी. आणि म्हणूनच आपण शिक्षक आहोत हे कोणत्याही व्यासपीठावर अभिमानाने सांगावे.
माझे विद्यार्थी, माझ्या विद्यार्थ्यांचे पालक, आपले सहकारी मित्र व शाळाप्रमुख आपल्या विषयी काय म्हणतात, त्यांना आपल्या कामा बद्दल काय वाटते आणि हो, स्वतःला आपल्या कामात आनंद मिळतो कां? या दृष्टीने आपल्या कामाकडे पहावे. कारण हाच आपला समाज असतो. या समाजाकडून जर समाधान व्यक्त केले जात असेल तर आपल्याला कोणत्याही वेगळ्या प्रकारच्या प्रतिष्ठेची गरज नाही !
शिक्षक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

डॉ. ह.ना. जगताप
दि. ०५ /०९/२०२३