वेंगुर्ले : बुधवारी दुपारी दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले वेंगुर्ला -पेंडूर येथील युवा शेतकरी हरेश सदाशिव गावडे (४५) यांचे उपचारापूर्वीच दुर्दैवी निधन झाले आहे. हा अपघात बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तळवडे, मातोंड मार्गावरील डॉ. कांडरकर हॉस्पिटलनजीक घडला होता. हरेश गवडे यांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात मयत यांचे चुलत भाऊ अमर गावडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पेंडूर येथील हरेश गावडे हे आज बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने तळवडे येथे बाजारात जात असताना दुचाकीवरून अचानक रस्त्यावर पडून गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. यावेळी घटनास्थळी नातेवाईक व ग्रामस्थांनी धाव घेतली व त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी हरेश गावडे यांना तपासून मयत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती गावात समजतात अनेकांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. रुग्णालयात पोलीस हवालदार महेश जाधव व आबा पीरणकर यांनी पंचनामा केला असून विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.





