कणकवली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील समर्थ भारत आणि आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. भाजपचे कणकवली, देवगड, वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी सरपंचांनाच ग्रामविकास करण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी मतदारसंघातील नवनिर्वाचित प्रत्येक सरपंचाला ग्रामविकासाचे धडे दिले जाणार आहेत. विकास निधी कसा मिळवावा, योजना कशा राबवाव्यात, ग्रामसभांमध्ये कशा पद्धतीने ग्रामविकासाचे ठराव संमत करावेत या अशा सर्वच बाबतीचे प्रशिक्षण ६ व ७ फेब्रुवारी रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर, जि. ठाणे येथे दिले जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायत ही विकासाची मोठी केंद्रे ठरणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील समर्थ भारत, आत्मनिर्भर भारत हा ग्रामविकासाच्या मार्गाने समृद्ध होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि येणारा अमृत काल यांच्या संगमावर आज भारत देश नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने विकासाची झेप घेत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत सक्षम होणे ही काळाची गरज आहे. या ग्राम विकासाला सरपंच दिशा देतात. त्या सरपंचांना जर योग्य ते प्रशिक्षण दिले, त्यांना विकासाची व्हिजन दिले तर एक विलक्षण सकारात्मक बदल घडून येईल या भूमिकेतून आमदार नितेश राणे यांनी कणकवली, देवगड वैभववाडी मतदार संघातील सरपंचांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर, जि. ठाणे येथे निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ६ व ७ फेब्रुवारी या काळात हे विशेष शिबीर म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर, जि. ठाणे येथे संपन्न होणार आहे.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर निवडक २१ सरपंचांना पाठविणार असून पुढील टप्प्यात इतर सरपंचांचे प्रशिक्षण पार पडेल. सरपंचांना कर्तव्ये, अधिकार, योजना, निधी, कार्यपद्धती ग्रामसभा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही राज्यातील एक नामवंत आणि दर्जेदार प्रशिक्षण संस्था आहे. अशा दर्जेदार संस्थेत प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी नव निर्वाचित सरपंचांना मिळणार असून त्याचा फायदा आपल्या जिल्हयाला होणार आहे.





