दुर्दैवी… गगनचुंबी इमारतींच्या ध्यासाने केला घात ; रेमी ल्युसिडीचा ६८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू!

175

हाँगकाँग : गगनचुंबी इमारती चढून जाण्यासाठी प्रसिद्ध असलेला फ्रान्सचा रेमी ल्युसिडी (वय ३०) याचा आज येथील एका इमारतीच्या ६८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्याचे धाडस जसे काळजाचा ठोका चुकविणारे असायचे तसाच त्याचा मृत्यूही अत्यंत धक्कादायक पद्धतीने झाला.

हाँगकाँगमधील ट्रिगंटर टॉवर ही गगनचुंबी इमारत चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन पडल्याने ल्युसिडी याचा मृत्यू झाला. येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ल्युसिडी हा या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी संध्याकाळी सहाच्या सुमारास आला.

४० व्या मजल्यावर राहणाऱ्या मित्राकडे जायचे आहे, असे सुरक्षा रक्षकाला सांगत त्याने इमारतीत प्रवेश केला. मात्र, सुरक्षा रक्षकाने चाळीसाव्या मजल्यावरील संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता त्यांना ल्युसिडीबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. ही तपासणी करेपर्यंत ल्युसिडीने लिफ्टमध्ये प्रवेश केला होता. तो ४९ व्या मजल्यापर्यंत लिफ्टने गेला व त्यानंतर पायऱ्यांचा वापर करत इमारतीच्या गच्चीपर्यंत पोहोचला, असे ‘सीसीटीव्ही’मधून दिसले.

गच्चीवर शोध घेतला असता सुरक्षा रक्षकांना ल्युसिडी कोठेही आढळला नाही. मात्र, सात वाजून ३८ मिनिटांनी त्याने इमारतीच्या ६८ व्या मजल्यावरील (जमिनीपासून ७२१ फूट उंचावर) एका पेंटहाऊसच्या खिडकीवर थाप मारत मदतीची विनंती केली.

मात्र, या खिडकीबाहेर अचानक कोणीतरी व्यक्ती आल्याचे पाहून त्या घरातील घाबरलेल्या मोलकरणीने पोलिसांना फोन केला. पोलिसांच्या अंदाजानुसार, या पेंटहाऊसबाहेर ल्युसिडी अडकला होता आणि तोल जात असल्याने त्याने खिडकीवर थाप मारली. यानंतर त्याचा मृतदेह खाली आढळला.

अनेक धाडसी कृत्ये नावावर

दुबई, बल्गेरिया आणि फ्रान्ससह जगभरातील अनेक गगनचुंबी इमारती, उंच इमारतींवरील क्रेन, नद्यांवरील केबल पूल यावर चढून जाण्यासाठी रेमी ल्युसिडी प्रसिद्ध होता. त्याच्या ‘इन्स्टाग्राम’वर त्याच्या धाडसाचे पुरावे देणारी अनेक छायाचित्रे आहेत. धाडस करताना तो सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असे. एक स्टंट करताना तो फ्रान्समध्ये असलेल्या ९८० फूट उंच असलेल्या एक चिमणीच्या टोकापर्यंत गेला होता. त्याच्या मृत्युमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.