- ओव्हल : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात विंडीजने कसलेल्या भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली. वेस्ट इंडीजने आधी भारतीय संघाला 181 धावात गारद केले. त्यानंतर हे आव्हान त्यांनी 36 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आणली.
आता मालिकेचा निर्णय मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात होणार आहे. विशेष म्हणजे विंडीजने भारताविरूद्धचे आपले 10 पराभवांचे दुष्टचक्र तोडले. वेस्ट इंडीजकरडून कर्णधार शे होपने विंडीजला आशेचे किरण दाखवले. पहिल्या वनडे सामन्यात एकाकी झुंज देणाऱ्या होपला आजच्या सामन्यात केसी कार्टेची अनमोल साथ लाभली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 91 धावांची नाबाद खेळी केली. शे होपने 80 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. तर कार्टेने 65 चेंडूत नाबाद 48 धावांचे योगदान दिले.भारताचे 182 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजने दमदार सलामी दिली. सलामीवीर किंग आणि कायल मेयर्स यांनी 53 धावांची सलामी दिली. मात्र यानंतर शार्दुल ठाकूरने पाठोपाठ दोन विकेट्स घेत विंडीजला अडचणीत आणले.
ब्रँडन किंग 15 तर कायल मेयर्स 36 धावा करून एकाच षटकात बाद झाले. त्यानंतर आलेला अथनाजे देखील 6 धावांचेच योगदान देऊ शकला. त्याचीही शिकार शार्दुलनेच केली. 3 बाद 72 धावा अशी अवस्था झालेल्या विंडीजला सावरण्यासाठी स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायर क्रीजवर आला होता. दुसऱ्या बाजूने कर्णधार शे होपने एक बाजू लावून धरली होती. या दोघांनी विंडीजला शतकाच्या जवळ पोहचवले होते. मात्र कुलदीप यादवच्या फिरकीने हेटमायरला चकवा दिला. 9 धावांवर खेळणाऱ्या हेटमायरचा कुलदीपने त्रिफळा उडवला. विंडीजची अवस्था 4 बाद 91 धावा अशी झाली होती. मात्र यानंतर आलेल्या केसी कार्टेने आपल्या कर्णधाराची साथ सोडली नाही. या दोघांनी नाबाद 91 धावांची भागीदारी रचत भारताला पराभवाच्या खाईत लोटले.





