….अन्यथा आंदोलन छेडणार ; हनुमंत सावंत यांनी दिला इशारा
कणकवली : शहरापासून अवघ्या २० कि. मी. वर असलेले कळसुली हे गाव मागील कित्येक दिवसांपासून नेटवर्क सुविधेपासून वंचित आहे. सदर गावात दोन टॉवर असून सद्यस्थितीत एकही टॉवर नेटवर्क कोणतेही काम करत नाही. अडी – अडचणीच्या काळात येथील ग्रामस्थांना मोठा पाश्चाताप सहन करावा लागत आहे. वारंवार संबंधित अधीकाऱ्यांकडे तक्रार करून देखील अधिकारी याबाबत फॉल्ट आणि कारण सांगतात मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाहीत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी BSNL च्या टॉवर ची उद्घाटने झाली मात्र आजपर्यंत बऱ्यापैकी ठिकाणी नवीन टॉवर उभारले गेलेच नाहीत तर बऱ्याच ठिकाणी असलेले जुने टॉवर दुरुस्त करणे कोणाला शक्य झालेले नाही.
बीएसएनएल च्या टॉवर मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने सध्या मोबाईल नेटवर्कचा बोजवारा उडाला असून, इंटरनेट सेवा कोलमडली आहे. तसेच कॉलिंगमध्येही आवाज तुटणे व अचानक कॉल कट होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने कळसुली गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
कळसुलीमध्ये बीएसएनएल व्यतिरिक्त कोणत्याही टॉवरचे गावात नेटवर्क नसल्याने शासकीय सेवा कोलमडली आहे. येत्या आठ दिवसात कळसुली गावातील बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बीएसएनएल कंपनी ला दिला आहे.





