फाटक पडल्याने येणारी जाणारी वाहतूक खोळंबली ; प्रशासनाची उडाली तारांबळ
कणकवली : तालुक्यातील हळवल रेल्वे फाटकावर सायंकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास येणारी रेल्वे ही कणकवलीहुन गोव्याच्या दिशेने जाताना हळवल येथील रेल्वे फटका नजीकच्या वागदे बोगद्यात थांबली. याबाबत अधिक माहिती घेतली असता हळवल रेल्वे फाटक्यावरील गेटमनने सांगितले की, रेल्वे फाटकावरून रेल्वे वेगात जात होती. मात्र बोगद्याच्या ठिकाणी गेली असता कोणत्या तरी पॅसेंजरने रेल्वेची इमर्जन्सी चैन ओढली. त्यामुळे रेल्वेचा इमर्जन्सी ब्रेक लागला आणि त्यामुळे गाडी वागदे येथील बोगद्यात थांबली.

यामुळे रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. सर्वत्र शोध घेतला असता रेल्वे अपघात दिसून आला नाही. मात्र एक व्यक्ती रेल्वे थांबल्याने बॅग घेऊन उतरून निघून गेल्याचे निदर्शनास आले.

मात्र सायंकाळी आपापली काम आटोपून घरी जाणारे नागरिक या ठिकाणी रेल्वेच्या गेटमुळे थांबले होते आणि रेल्वे जाऊन बराच वेळ निघून गेला तरी गेट न उघडल्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. दोन्ही बाजूला येण्या – जाण्याचे मार्ग देखील बंद झाले होते. त्यामुळे रेल्वे फटकावरील उड्डाण पुलाबाबतच्या प्रश्नांना पुन्हा एकदा रंगत चढू लागली आहे. त्यामुळे आता तरी असलेले प्रश्न, समस्या मार्गी लावून या ठिकाणी रेल्वे ब्रिज पूर्णत्वास जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





