कणकवली : शहरातील एका हॉटेलसमोरून मोबाईल चोरल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी परशुराम आनंद धोत्रे (रा. ओसरगांव, मूळ रा. बांदा) याला बांदा येथून अटक केली आहे. ही घटना शहरातील हॉटेल सह्याद्रीसमोर एप्रिल महिन्यात घडली होती. सागर शरद वरवडेकर हा युवक शहरातील पटवर्धन चौकातील दशावतारी नाट्यप्रयोग पाहण्यासाठी आला होता. नाट्यप्रयोग झाल्यानंतर तो हॉटेल सह्याद्री येथे जेवण्यासाठी गेला होता. त्यावेळी एक युवक त्याच्या आजू – बाजूला संशयास्पदरित्या वावरत होता. जेवण झाल्यानंतर सागर हॉटेलबाहेर पडला. त्यावेळी त्याने त्याचा मोबाईल त्याच्या दुचाकीवर ठेवून तो मित्राशी बोलत होता.
ही संधी साधून नजीकच संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तीने सागरचा मोबाईल चोरला. सागर हे लक्षात येताच तो त्याच्या जवळ गेला. परंतु, तो चपळाईने तिथून त्याच्या दुचाकीवरून वागदेच्या दिशेने पळून गेला. याप्रकरणी सागर वरवडेकर याने पोलिसांत फिर्याद दिली होती.





