वेंगुर्ले : चक्कर येण्याचे नाटक करून घरात आश्रय घेतलेल्या अनोळखी जोडप्याने वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील महिलेला बोलण्यात गुंतवून घरातील तब्बल ६७००० रुपये किमतीचे दागिने चोरून पळ काढला आहे. याप्रकरणी त्या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरवली वेतोबा मंदिर नजीक राहणाऱ्या सौ. किशोरी श्रीधर घाटये वय ५५ या घरी होत्या. रस्त्याला लागूनच त्यांचे घर असल्याने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका कार गाडी मधून एक अनोळखी जोडपे खाली उतरले आणि पत्नी गरोदर आहे. तिला चक्कर येत आहे, असे सांगून सौ.घाटये यांच्या घरात आराम करण्यासाठी आश्रय मागितला.

माणुसकीच्या दृष्टीने सौ.घाटये यांनी त्या महिलेला आपल्या बेडरूम मध्ये आराम करण्यासाठी नेले. दोन अडीच तास बोलण्याच्या नादात त्या जोडप्याने सौ.घाटये यांना आपण चांगली माणसे आहोत, असे भासविले. मात्र सौ.घाटये बाथरूम मध्ये गेल्या असता त्या जोडप्याने पलंगाखाली असलेली कपाटाची चावी काढून कपाटामध्ये डब्यात असलेले सोन्याचे दागिने काढून सौ.घाटये बाहेर येण्यापूर्वी घेऊन तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात सौ.घाटये यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिरोडा येथील पोलीस कॉन्स्टेबल श्री. दळवी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.





