कणकवली : भारतात विवेक वादाचा वारसा चार्वाक पासून सुरू होतो. मुक्त चिंतन करत स्वच्छ बुद्धी जितकी स्वतंत्र बनवता येईल तेवढी बनवा. व्यक्ती आणि समाजाच्या हिताचे जे तत्त्वज्ञान असेल ते स्वीकारा. त्यातच भारतीय विवेक वाद असेल. उच्च, नीच,शूद्र आणि श्रेष्ठ असा भेदभाव विवेक वादाला मान्य नाही.माणूस म्हणून प्रत्येकाकडे पाहिले पाहिजे अशी मांडणी थोर विचारवंत लेखक व्याख्याते डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केली. अखंड लोक मंच कणकवली- सिंधुदुर्ग आयोजित अखंड व्याख्यानमालेत “विवेक वादाचा भारतीय वारसा” या विषयावर थोर विचारवंत, लेखक, व्याख्याते डॉ. आ. ह. साळुंखे यांनी पहिले पुष्पगुंपले. त्यांचे स्वागत अखंड चे जिल्हाध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक यांनी केले. हे व्याख्यान कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात झाले.
यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी विवेक वादाचा भारतीय वारसा चार्वाक, जैन,बुद्ध, गोरक्षनाथ, बसवेश्वर,महानुभाव, श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव,संत चोखामेळा, संत जनाबाई,संत ज्ञानेश्वर, गुरुनानक, संत कबीर,संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राज ऋषी शाहू महाराज,संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा व्यक्तिमत्त्वांनी जोपासलेला विवेक वाद आहे. जो विचार मनुष्य हिताचा आहे.समाजहिताचा आहे. तत्वज्ञान स्वीकारणारा आहे.चांगले ते वेचून घेतलेला आहे.हा खरा विवेकवादाचा वारसा असल्याचे डॉक्टर साळुंखे म्हणाले. चार्वाक चा सिद्धांत हा स्वातंत्र्यालाच मोक्ष मानतो. मनाची आणि बुद्धीची दारे उघडी ठेवून विचार ग्रहण करावेत प्रसंगी त्याची समीक्षा करावी असे चार्वाक सांगतात. तर जैन धर्मात वेदांचे प्रामाण्य अंतिम मानलेले नाही. चातुर्वरणाला विरोध दर्शवलेला आहे. बुद्धाने तर स्वातंत्र्य आणि समतेलाच महत्व दिलेले आहे. सामान्यतील सामान्यने प्रश्न विचारावेत त्यांचे अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य कायम राहावे. प्रश्न विचारल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि एकिव गोष्टींवर विश्वास न करता ती पाहून अनुभवून ती गोष्ट निर्दोष आहे हे पटल्यानंतरच स्वीकारावी हा विचार गौतम बुद्ध देतात. बुद्धाने स्वतःचे मत सुद्धा तपासून घ्यावे अशी मांडणी केलेली आहे. म्हणजेच मी सांगितले किंवा मांडणी केली ती अंतिम सत्य आहे असे त्यांचे कधीही मत नव्हते. किंवा कोणताही कट्टरपणा त्यांच्या विचारात अजिबात नव्हता.या पहा खात्री करा आणि तो विचार स्वीकारा ही त्यांची भूमिका होती म्हणून तोच खरा विवेकाचा मार्ग आहे. विचार आचरनात आणणाऱ्याला त्यांनी प्रतिष्ठा दिली. सम्राट प्रसेनजीत याला मुलीचे महत्त्व सांगितले, मुलगी जन्माला आली तर ती स्वीकारलीच पाहिजे हे त्यावेळी सांगितलेले वचन आजच्या समाज व्यवस्थेलाही तेवढेच लागू पडत आहे. याची डॉक्टर आ.ह.साळुंखे यांनी आठवण करून दिली.गोरक्षनाथांनी समानता आणि संवाद वाढविण्याचा मार्ग दाखवला हे गोरक्षनाथ सामान्य स्थानातून आलेले होते. स्वामी बसवेश्वर यांनी अकराव्या ते विसाव्या शतकात क्रांतिकारी काम केले.समानता घडविणारे काम केले.अनुभव मंडप ही त्यांनी निर्माण केलेली संसद होती. त्याच्या अध्यक्षस्थानी मागासवर्गीय समाजातील अल्लभ प्रभु या व्यक्तीला बसवले. या संसदेत महिलांनाही मोठ्या संख्येने स्थान ठेवले. जात, वर्ग, श्रेष्ठ, पंथ ,पैसा, याचा भेदभाव करू नये माणूस म्हणून प्रत्येकाकडे पाहिले पाहिजे ही शिकवण बसवेश्वरांची होती.
महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी यांनीही स्त्रियांना सामाजिक महत्त्व प्राप्त करून दिले त्यांच्या काळात पहिली स्त्री कवी महदबा या उदयास आल्या. संत नामदेव ,संत चोखामेळा यांनीही क्रांतिकारी काम आणि विचार समाजात रुजवले त्यावेळी पुरुष -अस्पृश्यता तीव्र असताना सुद्धा जातीव्यवस्था गंभीर असताना सुद्धा निर्भयपणे त्यांनी काम केले. संत नामदेव त्याकाळी पंजाब पर्यंत पोहोचले गुरु ग्रंथ साहेब मध्ये त्यांनी लिहिलेले ६२ अभंग या पवित्र ग्रंथात समाविष्ट झाले तो ग्रंथ आज पवित्र ग्रंथ म्हणून जगाने स्वीकारलेला आहे. ज्या नामदेवांना शूद्र म्हणून आपल्याकडे हिणवले जात होते त्यांची वैचारिक क्षमता आणि विवेक वादी विचार किती प्रगल्भ होते हे यातून दिसून येते. चोखामेळाने व्यवस्थेविरुद्ध अभंग लिहिले. त्यांची पत्नी, बहीण,मुलगी जावई अशा सर्वांनीच लिखाण केले. तेराव्या शतकात चोखामेळा च्या निधनानंतर त्यांची हाडे गोळा करून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरासमोर पायरीवर संत चोखामेळा यांची समाधी स्थापन केली. आजही संत चोखामेळा समाधी आणि नामदेव पायरीचे दर्शन लोक घेऊनच मंदिरात प्रवेश करतात.ही त्यावेळच्या समाज व्यवस्थेवर विवेक वादाने केलेली क्रांती आहे. संत ज्ञानेश्वर सुद्धा याच विवेक वादी दृष्टीने पाहतात आणि म्हणूनच त्यांनी उपनिषदांवर भाष्य केले नाही तर गीतेवर भाष्य केले. वेदांना कंजूस म्हटले कारण ते फक्त ब्राह्मण,क्षत्रिय, आणि वैश्य यांच्यात कानी लागले. अशी टीका ज्ञानेश्वरांनी केली. गुरुनानक यांनी सुद्धा माणसे जोडणारा विवेक वाद मांडला. संत कबीर जीवनाचे वास्तव्य एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले ते आजही पावलो पावले आपल्याला स्मरणात येतात तर संत तुकाराम यांनी “वेदांचा तो वारसा आम्हासीच ठावा..” हे सांग वेद कसे स्वीकारावे आणि त्यातील काय घ्यावे काय घेवू नये हे माहीत आहे. असे ठणकावून सांगतात. जाती आणि कर्म कांडे यांच्या विरोधात भूमिका मांडली. चमत्काराला विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिणेकडे स्वारी केली तेव्हा माणसांची गुलाम म्हणून डचांकडून होणारी विक्री थांबवली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केली. अर्धांगवात झालेला असताना सुद्धा डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. यामागे समाज स्वावलंबी करण्याची तळमळ त्यांच्यात होती. राजर्षी शाहू महाराज यांनीही समानता अंगीकारली, आपल्या राज्यात त्याचे अनुकरणही केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच गुणवत्ता बुद्धिमत्ता आणि व्यासंगाची परिसीमा होते म्हणूनच संविधान निर्माण करून समाजाला विवेकवादी विचार दिला. संत गाडगेबाबांनी सत्याचा शोध घेण्याचा मार्ग दाखविला. अशा पद्धतीने विवेक वादाचा वारसा भारताला आणि महाराष्ट्राला मिळालेला आहे असे डॉक्टर आ. ह. साळुंखे यांनी सांगितले.





