नेहरू युवा केंद्र आयोजित युवा उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

सावंतवाडी : देशभर सध्या नेहरू युवा केंद्र आयोजित युवा उत्सव बहुतांश जिल्ह्यात सुरू आहेत . हे युवा उत्सव साजरे करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचप्राण अर्थात पाच तत्वे युवकांसमोर ठेवली आहेत ठेवली आहेत .यामध्ये विकसित भारताची निर्मिती , गुलामगिरीच्या विचारातून मुक्ती , भारताच्या महान सांस्कृतिक वारशाचा अभिमान , एकता आणि एकजूटपणा तसेच नागरिक म्हणून कर्तव्य हे ते पंचप्राण आहेत . युवकांमध्ये हे सर्व पोहोचावे आणि रुजावे यासाठी नेहरू युवा केंद्र च्या माध्यमातून देशातील बहुतांश जिल्ह्यात युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . या पंचप्राणावर आधारित विविध स्पर्धा या उत्सवात आयोजित करण्यात येत आहेत . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा उत्सव सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे संपन्न झाला . या उत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

तळवडे येथील जनता विद्यालय येथील आयोजित युवा उत्सवात कविता लेखन , मोबाईल फोटोग्राफी , चित्रकला , वकृत्व आणि लोक कलांवर आधारित समूह नृत्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . या सर्व स्पर्धांमध्ये जिल्हाभरातील युवकांनी , विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवला . अशा स्पर्धांमधून आमच्या कलागुणांना वाव मिळतो तसेच अंगीभुत कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ या युवा उत्सवच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्राने आम्हाला दिले असल्याची भावना सहभागींनी व्यक्त केली.

युवा उत्सव देशभर साजरा करण्यासाठी काही महत्त्वाची ध्येयधोरण समोर ठेवण्यात आली आहेत . यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव युवकांच्या प्रेरणेतून साजरा करणे , स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे स्वातंत्र्यसैनिक लढले त्यांच्याबद्दलची माहिती जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी , भारताची वैविध्यपूर्ण अध्यात्मिक आणि सांस्कृतिक तत्वे याबद्दल आदर निर्माण करणे , विविध प्रकारच्या युवा कलाकारांचे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समूह करणे तयार करणे आणि युवाशक्तीला त्यांची कला सादर करण्यासाठी जिल्हा , राज्य आणि देश पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे ही ध्येय धोरणे युवा उत्सवासाठी आखून देण्यात आली आहेत