पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) ची लेखी परीक्षा गुरुवार, दिनांक ०२/३/२०२३ ते शनिवार, दिनांक २५/०३/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी एकूण १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८.४४.१९६ विद्यार्थी ७,३३,०६७ विद्यार्थीनी आहेत. एकूण २३,०१० माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५०३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजितकरण्यात आली आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
परीक्षेची ठळक वैशिष्टये
मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून सरल डेटावरुन माध्यमिक शाळांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक ०१/०३/२०२३ पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे.
मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचे वेळापत्रक दि. ३०/१२/२०२२ रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय व मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच स्तरावर राज्यमंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परीरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोर्बाइलमध्ये करावयाचे आहे. तसेच संपूर्ण केंद्र परिसराचे चित्रीकरण करावयाच्या सूचना या परीक्षेपासून संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
सर्व परीक्षाथ्र्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षाथ्र्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षाथ्र्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात स.११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु.३,०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. तथापि पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
मार्च २०२३ च्या परीक्षेसाठी प्रथमच लेखी परीक्षेपूर्वी गैरमार्ग प्रकरणी विद्याथ्र्यांसमोर शिक्षा सूचीचे तसेच
उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचे वाचन करणेबाबत सर्व माध्यमिक शाळांना विभागीय मंडळामार्फत सूचित करण्यात आलेले आहे. १०) इ.१० वी परीक्षेसाठी दिव्यांग गटाच्या विविध संवर्गातून पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना दिनांक १६/१०/२०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रचलित पद्धतीप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी संबंधितांनी विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व घटक समावेशक असा ‘गैरमार्गाशी लढा’ या अभियानाचा कृति कार्यक्रम या वर्षी देखील मंडळाने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्व विचारात घेवून याबाबत नियोजन करण्यात आले आहे व त्यानुसार स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थ्यांचे उद्बोधन, इ.द्वारे या अभियानाचा कृति कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच मा. विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांच्या परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी व परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण इ. उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना व सर्व मा. विभागीय आयुक्तांना तसेच मा. जिल्हाधिकारी यांना अर्धशासकीय पत्र पाठवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व अधिक जबाबदार भावी पिढी निर्माण व्हावी याकरीता व परीक्षा पध्दतीवरील विश्वास व आदर वृध्दींगत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या मदतीने ‘गैरमार्गविरूध्द लढा’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना राज्यामध्ये या वर्षीपासून कॉपीमुक्त अभियान राबविणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
केंद्रसंचालक / उपकेंद्रसंचालक व परिरक्षक यांच्या विभागीय मंडळ स्तरावर बैठका आयोजित करण्यात
आल्या आहेत.
राज्यमंडळामार्फत सर्व विभागीय मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतलेला आहे.
मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय/अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी
परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकल्यास अशा विद्याथ्र्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि.२७/०३/२०२३ ते २९/०३/२०२३ या कालावधीत Out of Turn ने आयोजित करण्यात आलेली आहे.
मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका देताना एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकिट याप्रमाणे पाकिटे देण्यात येणार आहेत.
२५ प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट पर्यवेक्षक आपल्या परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची स्वाक्षरी घेवून व तदनंतर स्वतःची स्वाक्षरी करून उघडतील. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यास आणखी मदत होणार आहे.
मार्च २०२३ च्या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व शाळांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉलतिकीट) देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रावर मराठी व इंग्रजीतून सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रवेशपत्रावर विषयासमोर दिनांक व परीक्षा कक्षात उपस्थित राहण्याची वेळ याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
इ.१० वी परीक्षांच्या कालावधीत गैरमार्गास आळा घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांच्या भेटीचे नियोजन विभागीय मंडळ स्तरावरून करण्यात येणार असून ज्या त्या पेपरच्या दिवशी सकाळी संबंधित भरारी पथकांना नियोजन देण्यात येईल.
उपरोक्त बाबी वेळोवेळी सर्व माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना कळविण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित माध्यमिक शाळांशी संपर्क साधावा. विद्याथ्र्यांनी कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) व उत्तरपत्रिकेवरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन व पालन करावे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी) मुख्य परीक्षेनंतरची पुरवणी परीक्षा सर्वसाधारणपणे जुलै-ऑगस्ट मध्ये आयोजित करण्यात येत आहे..





