मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या प्रमुख ठिकाणांपैकी देवबाग हे आकर्षणाचे ठिकाण आहे. देवबागचा पूर्णपणे विकास शिवसेनेच्या माध्यमातून केला जाणार असून दांडी प्रमाणेच देवबागच्या संपूर्ण किनारपट्टीवर बंधारा बांधण्यासाठी तसेच देवबाग खाडीतील नष्ट होत चाललेले त्सुनामी आयलंड फ्लोटिंग आयलंडच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी बुधवारी मालवण येथे दिली. मालवण येथे लवकरच पर्यटन चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही सावंत यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षाचे नेते ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत देवबाग गावाची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हा सचिव किसन मांजरेकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, तालुकाप्रमुख महेश राणे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, उपतालुकाप्रमुख पराग खोत, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रोड्रिंक्स, श्रीमंतीनी गाेवेकर, कुडाळ उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, रिया आचरेकर, राजा ताेंडवळकर, अच्युत, उदय राउत, प्रमोद राणे, तबसुम शेख, मनवेल फर्नांडिस, दिपक सावंत, अच्युत राऊत यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी सुधीर सावंत म्हणाले, देवबाग किनाऱ्यावर बंधारा होण्याच्या दृष्टीने आज आम्ही पाहणी केली असून बंदर विभागाला देवबाग किनाऱ्याचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसें आदेश मुख्यमंत्री ना. शिंदे यांनीही दिले आहेत. पर्यटन विकास करताना पर्यटन हे स्थानिकांना रोजगार देणारे तसेच पर्यटकांना चांगली सेवा देणारे हवे. येथील निवास न्याहारी योजना उच्च दर्जाची होणे आवश्यक आहे. हॉटेल्सना ज्याप्रमाणे स्टार दिले जातात तशी स्टार प्रमाण योजना निवास न्याहारी मध्ये राबवून शासनाकडून दर निश्चित झाले पाहिजेत. पर्यटनाशी यासारख्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे, असेही सुधीर सावंत म्हणाले.
मासेमारी विषयक विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यासाठी पुढील महिन्यात चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मच्छिमारांचे प्रश्न सोडवून त्यांचे कल्याण करण्यास प्रयत्नशील आहेत असेही सुधीर सावंत यांनी यावेळी सांगितले. मालवण शहरातील भुयारी गटार योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही. ती कां पूर्ण झाली नाही याची आम्ही चौकशी करणार आहोत. मालवण शहरात घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नाहीय. यासाठी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना घेऊन कचरा व्यवस्थापनाबाबत ठोस कार्यक्रम आम्ही जाहीर करणार असून यासाठी नगरोत्थान योजनेतून २ कोटीचा निधी मिळावा अशी मागणी शासनाकडे करणार आहोत. मालवणातील विविध प्रश्नांवर नागरिकांची बैठक घेणार आहोत, असेही सुधीर सावंत यांनी सांगितले.





