देवस्वारांच्या पवित्र तीर्थस्थानाने कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेची सांगता…!

249

देवगड : दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोसवाची सांगता आज सोमवार 20 फेब्रुवारी रोजी देवस्वाऱ्यांच्या पवित्र तीर्थस्थानाने झाली. साधारणतः १० ते १२ लाख भाविकांची शिवतीर्थावर गर्दी उसळली होती. कुठलाही अनुचित प्रकार न घडता यात्राउत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष संतोष लब्दे यांनी व्यक्त केले.

श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधी संपन्न झाली. दोन वर्षाच्या कोविड महामारीनंतर यावर्षीच्या कुणकेश्वर यात्रेला विक्रमी गर्दी यावर्षी पहायला मिळाली. यात्रेत श्री देव कुणकेश्वराच्या दर्शना बरोबर भाविकांनी खरेदीसाठी ही मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पहायला मिळाली. त्यामुळे यावर्षी व्यापारी वर्गाची उलाढालही चांगल्या पद्धतीने झाल्याने व्यापारी वर्गातही समाधान दिसत होते.कुणकेश्वरला येणाऱ्या भाविकांची वाढती वर्दळ पहाता अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झालेला पहायला मिळाला. वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी काही वेळा मार्गातही बदल करण्यात आला. शुक्रवारी उत्तररात्री साडेबारा वाजता श्री देव कुणकेश्वराची विधी पूजा सुरुवात झाली.

शासकीय,लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर अडीच वाजता दर्शनासाठी दर्शन रांगा खुल्या करण्यात आल्या.यात्रा कालावधीत केंद्रीय मंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे,आमदार वैभव नाईक, मनसेचे संतोष शिंगाडे , सुशांत नाईक, अतुल रावराणे,संदेश पारकर, तसेच इतर लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, उद्योजक, यांनी श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेस भेट देत कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावर्षी सुलभ व जलदरीत्या भाविकांना दर्शन मिळेल अशी व्यवस्था केल्यामुळे भाविकांना जास्त वेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागत नाही. दर्शनाबरोबर व यात्रेत फिरण्याकडे भाविकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसत होता.

सोमवारी सोमवती अमावस्या असल्याने रविवारी उत्तर रात्री बारा वाजले पासूनच भाविक समुद्र तीर्थावर पवित्र तीर्थस्थानाचा लाभ घेताना दिसत होते.सकाळी पाच वाजता श्री देव कुणकेश्वरची काकड आरती झाली यानंतर साडेसहा नंतर श्री देव लिंगेश्वर आसरुंडी मालवण, श्री जयंतीदेवी पळसंब मालवण व श्री देव रवळनाथ वांयगणी या तीन देवस्वाऱ्या पवित्र तीर्थस्थानासाठी समुद्रतीर्थावर गेल्या पवित्र समुद्रतीर्थस्थानाने या यात्रेची सांगता झाली.

सोमवार हा शंभू महादेवाचा वार असल्याने मोडयात्रेत खरेदी बरोबर दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती. यावर्षी दर्शनासाठी भाविकांना जास्तवेळ रांगेत उभे राहावे लागले नाही याचे समाधान वाटते. असे मत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे आणि व्यक्त करत यात्रोत्सवास यशस्वी करण्यासाठी शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा, सर्व शासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी उद्योजक प्रसार माध्यमे, भाविक, व्यापारी व देवस्वाऱ्या यासर्वांचे आभार व्यक्त केले.