नारायण राणे यांच्या हस्ते पत्रकार भवनचे उद्घाटन…!

116

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन याचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले. यानंतर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला राणे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या स्मारक भवनात सुसज्ज सभागृह उभारण्यात आले आहे. तसेच आर्ट गॅलरी, वाचनालय, कॉन्फरन्स हाॅल देखील उभारण्यात आले आहेत. या सर्व संकुलाची पाहणी नारायण राणे यांनी यावेळी केली. मुख्य उद्घाटन समारंभ सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात झाला. या ठिकाणी दीप प्रज्वलन करून राणे यांनी भावनाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

पत्रकारांनी सकारात्मक विचार करून पत्रकारिता करावी राजकीय बातम्यांपेक्षा विकासाच्या बातम्यांवर भर द्यावा असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. राणे सिंधुदुर्ग मध्ये उभारण्यात आलेल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक तथा पत्रकार भवन याच्या उद्घाटन समयी बोलत होते . बाळशास्त्री जांभेकर यांचा आज 211 वा जयंती दिन आहे. त्यांनी पत्रकारिता समाज सुधारणेसाठी केली अशीच पत्रकारिता पत्रकारांनी करावी. पत्रकार समाजाला दिशा देत असतात त्यामुळे सकारात्मक आणि विकासात्मक बातम्या केल्याने समाजाची धारणा देखील तशा पद्धतीने घडली जाईल, असे राणे पुढे म्हणाले.

नियोजित कार्यक्रमात व्यस्त असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काहीशा विलंबाने दूरदृश्य प्रणाली द्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. हे पत्रकार भवन येथील पत्रकारांना सकारात्मक पत्रकारितेची प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांसमवेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सुद्धा दूरदृष्टी प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.

उद्घाटन समारंभात सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे काही माजी अध्यक्ष तसेच पत्रकार भवन उभारण्यात भरीव सहकार्य केलेल्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.