कणकवली : जगात प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे. प्रेम जीवनाच्या सुरुवातीला ही होते. जीवनाच्या नंतरही असेल. मर्यादित न राहता चाकोरीबाहेर जाऊन विचार करा आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करा, असे आवाहन कवयित्री व गायीच्या रूपाली कदम यांनी साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित माझं व्हॅलेंटाईन या विषयावर बोलताना केले. माझं व्हॅलेंटाईन पत्रलेखन काव्य स्पर्धेत सिद्धी वरवडेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित माझं व्हॅलेंटाईन पत्र लेखन काव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कणकवली येथील युनिक अकॅडमी च्या हॉल मध्ये संपन्न झाला.
साद फाउंडेशन आयोजित माझं व्हॅलेंटाईन स्पर्धेत स्पर्धकांनी आपले व्हॅलेंटाईन काव्य तसेच पत्र रूपात मांडले. यावेळी कवयित्री व गायिका रूपाली कदम, समीक्षक व लेखक अच्युत देसाई साद फाउंडेशनचे अध्यक्ष व कुडाळ नगरपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक, पंचायत समिती प्रशासन अधिकारी सुगंधा देवरूखकर, सादचे सचिव आणि युनिक अकॅडमीचे संचालक सचिन कोरलेकर, श्री. कदम, लेखक कवी श्रेयश शिंदे आदी उपस्थित होते.
व्हॅलेंटाईन डे निमित्त आयोजित केलेल्या पत्रलेखन व कार्य स्पर्धेत कु. सिद्धी वरवडेकर हिने प्रथम क्रमांक तर अर्चना परब यांनी द्वितीय तर शैलजा पांढरे व दर्शना पाताडे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. काशिनाथ वर्देकर, मधुरा गावकर सिद्धी वंजारे यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले. साद फाउंडेशनने आयोजित केलेल्या या पत्रलेखन व काव्य स्पर्धेला सर्वच वयोगटात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परीक्षक म्हणून अच्युत देसाई यांनी काम पाहिले. विजेत्यांना एल. एम. नाईक स्मृतीप्रित्यर्थ बक्षीस प्रमाणपत्र भेट वस्तू देऊन अध्यक्षा गीतांजली नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.





