वाडा येथील ७८ वर्षीय वृद्ध बेपत्ता

1

देवगड / प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील वाडा मूळबांध येथील प्रफुल्ल शांताराम जाधव (वय ७८) हे १८ मे २०२६ पासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा पारस प्रफुल्ल जाधव (सध्या रा. मुंबई, मूळ रा. वाडा- मूळबांध) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाडा मूळबांध येथील प्रफुल्ल जाधव हे घरात एकटेच राहत होते. तेथील कालिचरण दास हे त्यांचे केअर टेकर म्हणून काम करीत होते. १८ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल जाधव यांनी दास यांच्याकडून ५०० रूपये घेतले व ते काहीही न सांगता घरातून निघून गेले. दरम्यान, मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास असणारा प्रफुल्ल जाधव यांचा मुलगा पारस जाधव यांना दास यांनी ८ जून रोजी फोन करून प्रफुल्ल जाधव हे मुंबई येथे तुमच्याकडे आले आहेत का, अशी विचारणा केली. मात्र, ते मुंबईत आले नसल्याचे पारस जाधव यांनी त्यांना सांगितले. प्रफुल्ल जाधव हे बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर पारस जाधव यांनी गावी येत वडिलांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही शोध न लागल्याने पारस जाधव यांनी शुक्रवारी सायंकाळी देवगड पोलीस स्थानकात वडील प्रफुल्ल जाधव हे बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.