देवगड (प्रतिनिधी)
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या रिफ्रेशर परीक्षेत देवगड तालुक्यातील तायक्वांदो प्रशिक्षिका सौ. शेवंता नाईक यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन देवगड तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.सदर परीक्षा तायक्वांदो खेळातील तांत्रिक कौशल्य, शारीरिक क्षमता आणि आत्मसंरक्षणाच्या विविध अंगांचा कस लावणारी असल्याने ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होत सौ. नाईक यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
या यशामागे त्यांना देवगड तालुका तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्री. विवेक नलावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळेच शेवंता नाईक यांनी या परीक्षेसाठी आत्मविश्वासाने तयारी करून यश मिळवले.
त्यांच्या या यशाबद्दल देवगड तालुक्यातील क्रीडाप्रेमी, सहकारी प्रशिक्षक व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



