वैभववाडी (प्रतिनिधी)
स्पर्धा परिक्षांवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून प्रशासकीय अधिकारी बना – पोलीस निरीक्षक उदय झावरे
कोकणातील जैन समाज बांधवांनी आपली धर्माची संस्कृती जोपासत असताना या भागात जैन धर्म टिकविण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहेच त्याचबरोबर या समाज बांधवांच्या माध्यमातून साडवली सारख्या भागात समाजातील सामाजिक ,सांस्कृतिक ,धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा विशेषता गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ,गुणगौरव करून त्यांच्या कार्याची आणि यशाची दखल घेतली ही बाब अतिशय उल्लेखनीय असून गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता कोणतेही यश जगात कोणत्याही क्षेत्रात संपादित करण्याची गोष्ट अवघड नाही त्याकरिता मेहनत आवश्यक आहे. दहावी शालांत परीक्षेतील यश ही पहिली पायरी आहे, या पुढील काळात एमपीएससी ,यूपीएससी अशा स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित करून अधिकाधिक गुणवंत व्हावे आणि प्रशासकीय सेवेत येण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी साडवली येथे आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले.
जैनोनती मंडळ साडवली, दिगंबर जैन कासार समाज संस्था (भारत)शाखा रत्नागिरी आणि जैन कासार महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साडवली येथे गुणवंत गौरव सोहळा पार पडला या सोहळ्यास प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक उदय झावरे,पोलीस उपनिरीक्षक विलास दिडपसे ,दिगंबर जैन कासार समाज संस्था कोकण अध्यक्ष दयानंद मांगले, दक्षिण भारत जैन सभा कोकण विभाग उपाध्यक्ष अजित शिराळकर यांचे समवेत प्रदेश उपाध्यक्ष अजित मोहिरे, महिला प्रदेश अध्यक्ष सौ प्रभा मांगले,रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अशोक मोहीरे मंडळ अध्यक्ष डॉ संजय धने, बाळशेठ मोहिरे , बाबा डोर्ले,जयेंद्र मांगले, प्रकाश मोहिरे व अन्य उपस्थित होते.
नमोकार महामंत्राने सोहळ्याची सुरुवात होवून दिवंगत समाज श्रावक श्राविकांना श्रध्दांजली अर्पण केली.प्रास्तविक ऍड प्रभा मांगले यांनी करून डायसचे उद्घाटन करण्यात आले.नांदनी महादेवी हत्ती परत मिळावा यासाठी सामूहिक नमोकार महामंत्र जप करण्यात आले.
यानंतर ज्येष्ठ श्रावक, श्राविका समाजबांधव भगिनी, सामाजिक शैक्षणिक,धार्मिक,शासकीय प्रशासकीय सेवा,क्रीडा क्षेत्र व्यवसाय यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधव व भगिनी यांचा सन्मान करण्यात आला .
या प्रसंगी पोलीस निरीक्षक विलास दीडपसे,यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थी वेगाने विशेष ध्येय बाळगून प्रयत्न करावे व यश संपादित करावे असे सांगून शुभेछ्या व्यक्त केल्या.दयानंद मांगले ,आणि अजित शिराळकर यांनी जैन समाज संस्था राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेछ्या व्यक्त केल्या .
आपल्या अध्यक्षीय समारोप भाषणात डॉ संजय धने यांनी मंडळ कार्याचा आढावा घेवून देणगीदार यांचे कौतुक व सन्मान केला. आभार प्रकाश मोहिरे यांनी मानले.