देवगड युथ फोरमच्या ऍक्टिव्हिस्ट ऑफ द ईयर २०२५’  पुरस्काराने युवा कलाकार ऋत्विक धुरी सन्मानित 

133

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड युथ फोरमच्या ऍक्टिव्हिस्ट ऑफ द ईयर २०२५’  पुरस्काराने युवा कलाकार ऋत्विक धुरी सन्मानित 

देवगडमधील युथ फोरम या सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा इंद्रप्रस्थ हॉल येथे उत्साहात पार पडला. गेल्या पाच वर्षांत या संस्थेने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्धापन दिनात संस्थेच्या नव्या योजनांची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना संस्थाध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळावे यासाठी श्री. स. ह. केळकर महाविद्यालयात विद्यार्थी युनिट स्थापन करण्यात आले असून लवकरच विद्यार्थी हेल्पलाइन नंबर देखील सुरू केला जाईल. यासोबतच, भविष्यात देवगड तालुक्यातील इतर महाविद्यालयांमध्येही युनिट्स स्थापन केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
या युनिटच्या अध्यक्षपदी दीपक जानकर, उपाध्यक्षपदी देवांत गावकर आणि पूर्वा चौगुले, सचिवपदी सलोनी कदम, सहसचिवपदी स्नेहा भस्मे आणि इतर १० सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात यंदाचा ‘ऍक्टिव्हिस्ट ऑफ द ईयर २०२५’ हा पुरस्कार युवा कलाकार ऋत्विक धुरी यांना देण्यात आला. हा सन्मान संस्थेचे सचिव अमित पारकर आणि दयानंद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजयुमोचे शहराध्यक्ष दयानंद पाटील, युवा उद्योजक सनित आचरेकर, निनाद देशपांडे, परिमल नलावडे, जितेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्थेने नुकताच नाट्य महोत्सव आयोजित केला होता आणि त्यातून युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू असल्याचे ॲड. माणगांवकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित पारकर यांनी, सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन भूषण दातार यांनी मानले.