कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या कार्याची चेअरमन भाऊ चव्हाण यांनी केली प्रशंसा
तालुकाध्यक्षांसह जिल्हा कार्याध्यक्षांचे मोलाचे मार्गदर्शन
कणकवली तालुका नाभिक संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार श्री संत सेना महाराज व्यावसायिक पतसंस्थेचे नूतन चेअरमन तथा मालवण तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण यांनी काढले. शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा नाभिक नेते अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी संत सेना महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात सर्व नाभिक बंधू-भगिनींनी संत सेना महाराजांच्या जीवनावर आधारित कै. आशुतोष कुबल यांनी लिहिलेली आरती म्हटली. तातोबा प्रकाश चव्हाण यांनी सुंदर वाद्यवृंद साथ दिली, तर कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे यांनी सुंदर आरती गायिली. तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण, उपाध्यक्ष निलेश चव्हाण, कार्याध्यक्ष संजय कुबल, महिला तालुकाध्यक्षा तेजस्विनी चव्हाण, कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण, कोषाध्यक्षा अभिलाषा शिंदे, महिला सचिव आरती चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ज्येष्ठ सदस्य सुभाष चव्हाण यांनी गाऱ्हाणे घातले. जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण आणि जिल्हा महिला खजिनदार शिवानी चव्हाण यांच्या शुभहस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीचे षोडशोपचार पूजन करण्यात आले. याप्रसंगी नाभिक नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण आणि जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण यांनी उपस्थित सर्वांना संघटनात्मक विषयांवर अनमोल मार्गदर्शन केले.
मागील १० मार्च रोजी झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्तच्या उपक्रमांचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले, तसेच मागील खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. श्री संत सेना महाराज व्यावसायिक पतसंस्थेचे नूतन चेअरमन भाऊ चव्हाण, उपचेअरमन शंकर पिंगुळकर आणि संचालक शंकर चव्हाण यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मालवण तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण म्हणाले की, कणकवली तालुका नाभिक संघटनेचे उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहेत आणि आपल्या नाभिक समाजाला प्रगतीकडे नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत.
तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी उपस्थितांना ‘सावंतवाडी सेमिनार’बद्दल माहिती दिली आणि सेमिनारला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच, जून ते जुलै २०२५ मध्ये कणकवली तालुका स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या सेमिनारच्या आराखड्यावर चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात प्रवीण कुबल यांनी लिहिलेल्या ‘नाभिकायन : एका प्राथमिक शिक्षकाची कहाणी’ या पुस्तिकेचे प्रकाशन भाऊ चव्हाण, तालुका कार्यकारिणी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे, उपाध्यक्ष निलेश शिंदे, नाभिक नेते अनिल अणावकर आणि बँकेचे संचालक शंकर चव्हाण, कोषाध्यक्षा अभिलाषा शिंदे यांनीही आपले विचार व्यक्त केले. तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
या कार्यक्रमाला तळेरे, नांदगाव, खारेपाटण, कणकवली, फोंडा, ओसरगाव आणि कनेडी विभागातील मिळून पासष्ट पेक्षा जास्त नाभिक बंधू-भगिनी उपस्थित होते.