कणकवली (अनुपम कांबळी)
लढण्याची हिंमत ठेवणारा कधीही संपत नसतो…! निष्ठेचे पाईक माजी आमदार वैभव नाईक वाढदिवस विशेष
दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघात वैभव नाईकांचा पराभव झाला. टेलिव्हिजनवर ही बातमी ऐकताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. याअगोदर कोकण रेल्वेचे शिल्पकार असलेल्या प्रा. मधु दंडवतेंचा १९९१ साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अशाच प्रकारे सिंधुदुर्गातील जनता हळहळली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुडाळ येथील पक्षीय मेळाव्यात
“मला आता आमदार म्हणू नका” असे भावुक उद्गार काढून वैभव नाईकांच्या अश्रुचा बांध फुटला, तेव्हा तो व्हिडीओ सोशल मीडियावर पाहताना राजकारणाशी काडीमात्र संबंध नसलेलेही अनेकजण गहिवरले. काही पराभव हे जिव्हारी लागतात कारण पराभूत झालेल्या नेत्याने जय-पराजयाच्या पलीकडे जावुन जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले असते. वैभव नाईक हे त्या नेत्यांपैकीच एक आहेत. ‘सदैव तुमच्यासोबत’ या उक्तीला जागुन त्यांनी गेली दहा वर्षे तळागाळातील जनतेशी घराघरात पोहोचून संपर्क ठेवला, ही गोष्ट त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा नाकारू शकत नाहीत. त्यांच्या पराभवाचे एकाच वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास ‘निष्ठावंताच्या गळ्यात धोंडा, पक्षबदलूना मणीहार’ असेच करावे लागेल. या पराभवानंतर ‘निष्ठेचे पाईक, वैभव नाईक’ हे अभिमानाने मिरवले जाणारे ब्रीदवाक्य एक जीवंत आख्यायिका बनली.





