सावंतवाडी : वैश्य समाज सक्षम झाला पाहिजे यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यासाठी समाजातील बांधवानी सुध्दा एकत्र येणे गरजेचे आहे आणि एकत्र आल्यास कोणतीही शक्ती आपल्याला मागे खेचू शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. आम्ही समाजाच्या पाठिंब्यामुळे इथवर पोहचू शकलो. इतर समाजाची साथ देखील आम्हाला आहे. परंतु आपल्या समाजाची असणारी साथ ही अधिक प्रेरणा देते. त्यामूळेच वैश्य समाजाच्या उन्नतीसाठी आपले सदैव सहकार्य राहील. याच पार्श्वभूमीवर समाजाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या वसतीगृहाच्या पाच खोल्या आपल्या कुटुंबांतर्फे बांधून देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी केली.
वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्यावतीने शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त ३५ वा वधू-वर परिचय मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी सावंतवाडीतील वैश्य भवन येथे हॉलमध्ये संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा वैश्यवाणी समाजाच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.
वैश्यवाणी समाज हा इतर समाजाच्या मदतीसाठी पुढे सरसावणारा आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपला अधिक भर असेल असं मत व्यक्त केले. तर जिल्ह्यातील वैश्य समाजाच्या महिलांना आपण लवकरच महाराष्ट्र भ्रमंतीच्या ट्रिप साठी पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, उद्योजक शाळीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषद अध्यक्ष शुभ्राय दिनानाथ शेठ उर्फ सुभाष मसुरकर, वैश्यवाणी समाज बेळगाव अध्यक्ष दत्ता कतबर्गी, वैश्य समाज सिंधुदुर्ग सचिव भार्गवराम धुरी, स्वागताध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, संदेश पारकर, तालुका समिती उपाध्यक्ष ॲड. पुष्पलता कोरगावकर, सेक्रेटरी शशिकांत नेवगी, खजिनदार गणेश बोर्डेकर, सदस्य दत्तप्रसाद मसुरकर, राजन पोकळे, साक्षी वंजारी, किर्ती बोंद्रे, नितीन वाळके, अशोक नाईक आदी उपस्थित होते.





