जामसंडे परिसरात बॉक्साईट व ॲल्युमिनियम लेटॅराईट खनिज सर्वेक्षण / पूर्वेक्षण करण्यास संबंधित जमीन मालकांचा तीव्र विरोध 

99

 

देवगड / प्रतिनिधी

जामसंडे परिसरात बॉक्साईट व ॲल्युमिनियम लेटॅराईट खनिज सर्वेक्षण / पूर्वेक्षण करण्यास संबंधित जमीन मालकांचा तीव्र विरोध 

जामसंडे परिसरात बॉक्साईट व ॲल्युमिनियम लेटॅराईट खनिज सर्वेक्षण / पूर्वेक्षण करण्यास संबंधित जमीन मालकांनी येथील न. पं. कार्यालयात आयोजित विशेष सभेत तीव्र विरोध दर्शविला. सर्वेक्षणानंतर भूसंपादन होईल व त्यानंतर येथील शेतकरी भूमिहीन होतील. त्यामुळे सर्वेक्षणानंतर शासनाची नेमकी भूमिका काय आहे? हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे अशी भूमिका जमीन मालकांनी घेतली. मात्र, यावर आम्ही केवळ सर्वेक्षण व संशोधन करून शासनाला अहवाल सादर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच या सर्वेक्षणालाच आमचा तीव्र विरोध आहे, अशी आक्रमक भूमिका जमीन मालकांनी मांडली. जमीन मालकांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात द्यावे, अशी सूचना खनिकर्म अधिकाऱ्यांनी जमीन मालकांना केली.

जामसंडे परिसरात १.५ चौ. कि. मी. क्षेत्रामध्ये खनिज सर्वेक्षण / पूर्वेक्षण योजना कार्यान्वित करण्यासाठी भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाच्या उपसंचालकांनी देवगड- जामसंडे न. पं. च्या सहकार्याने संबंधित जमीन मालकांशी चर्चा करण्यासाठी न. पं. कार्यालयात मंगळवारी दुपारी विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

व्यासपीठावर खनिकर्म संचालनालय कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक प्रशांत कोरे, भूवैज्ञानिक के. भानूचंद्र, कनिष्ठ भूवैज्ञानिक अजित पाटील, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, न. पं. गटनेते तथा न. पं. सार्वजनिक बांधकाम सभापती शरद ठुकरुल, पाणीपुरवठा सभापती अॅड. सौ. प्रणाली माने, महिला व बालकल्याण विभाग उपसभापती सौ. ऋचाली पाटकर, स्वच्छता सभापती सौ. आद्या गुमास्ते, नगरसेविका मनीषा जामसंडेकर आदी उपस्थित होते. उपसंचालक प्रशांत कोरे यांनी उपस्थित जमीन मालकांना सर्वेक्षणाबाबत माहिती देऊन सहकार्याचे आवाहन केले. यावेळी सर्वेक्षणानंतर भूसंपादन होणार नाही, याची लेखी हमी जमीन मालकांना देणार का, असा प्रश्न जमीन मालक योगेश गोळम यांनी उपस्थित केला. तसेच प्रस्तावित जागेमध्ये सुमारे ९० टक्के जमीन मालक शेती व्यवसाय करीत आहेत. खनिज उत्खननासाठी भूसंपादन झाल्यास येथील शेतकरी, जमीनदार देशोधडीला लागतील. भूमिहीन होतील. त्यामुळे सर्वेक्षणाला आमचा विरोध आहे, अशी भूमिका जमीन मालक यशवंत गोसावी यांनी मांडली.

प्रस्तावित जागेमध्ये बॉक्साईटची उपलब्धता किती आहे? त्याची गुणवत्ता व ते किती प्रमाणात आहे? याचे संशोधन केले जाईल. या संशोधनासाठी बोअरवेलची आवश्यकता असते. मात्र, या सर्वेक्षण व संशोधनासाठी कोणतेही भूसंपादन होत नाही, असे भूवैज्ञानिक के. भानूचंद्र यांनी सांगितले. यावर संशोधनानंतर येथे बॉक्साईट साठा उपलब्ध झाल्यास शासन पुढील कार्यवाही सुरू करणार. त्यामुळे येथे एक इंच जागेतही आम्ही सर्वेक्षण अथवा संशोधन करू देणार नाही, असे नगरसेवक बुवा तारी यांनी स्पष्ट केले. जमीन मालक प्रकाश जाधव म्हणाले, सर्वेक्षण व संशोधनाला सर्व जमीन मालकांचा तीव्र विरोध असल्याचे सांगताच उपस्थित जमीन मालकांनीही त्याला एकमुखी पाठिंबा दिला. जमीन मालकांचा विरोध असेल तर शासनाला कळविण्यात येईल. जमीन मालकांनी आपले निवेदन सह्या करून आम्हाला द्यावे, असे उपसंचालक प्रशांत कोरे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत धर्मराज जोशी, नगरसेवक बुवा तारी, योगेश गोळम, महेश रानडे, यशवंत गोसावी, सुधीर तांबे, प्रकाश जाधव, संदीप जाधव आदींनी सहभाग घेतला. यावेळी अॅड. अभिषेक गोगटे, अॅड. इंद्रनील ठाकुर, नगरसेवक नितीन बांदेकर, संतोष तारी, न. पं. प्रशासकीय अधिकारी रोहीत पाटील यांच्यासह सुमारे २०० जमीन मालक उपस्थित होते.