कणकवली(तुळशीदास कुडतरकर)
कणकवलीत आजपासून पर्यटन महोत्सवाला प्रारंभ ; १२ जानेवारी पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी ; शोभायात्रेचे खास आकर्षण
सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, पवनदीप- अरूणिता यांच्या ऑकेस्ट्राचे आयोजन
कणकवली शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणावर भाजपच्यावतीने ९ जानेवारी पासून कणकवली पर्यटन महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ५ वाजता शहरातून विविध चित्ररथांचा समावेश असलेली भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून कणकवली वासीयांसाठी ते खास आकर्षण असणार आहे. अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
इंडियन आयडॉल विजेते गायक सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार यांच्यासह पवनदीप आणि अरूणिता कांजिवाल तसेच चेतना भारद्वाज यांच्या गायनाचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याची संधी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने संगीत रसिकांना मिळणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार असून आमदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर कदम, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तर माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, निलम राणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे.
समीर नलावडे म्हणाले, पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता होणार आहे. त्यादृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे. उद्घाटना पूर्वी कणकवली शहरातील १७ प्रभाग आणि चार प्राथमिक शाळांचा सहभाग असलेल्या चित्ररथांसह भव्य शोभायात्रा निघणार आहे. त्यानंतर सलमान अली आणि वाद्यवृंद यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा होणार आहे.
१० जानेवारीला कणकवली शहर आणि परिसरातील तब्बल २५० कलावंतांचा सहभाग असलेला ‘कनकसंध्या’ हा कार्यक्रम रात्री ८ वाजता रंगणार आहे. ११ जानेवारीला इंडियन आयडॉल फेमच रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार आणि वाद्यवृंद यांचा ऑर्केस्ट्रा असणार आहे. रविवारी १२ जानेवारीला खासदार नारायण राणे, निलम राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर इंडियन आयडॉल फेम पवनदीप आणि अरूणिता कांजिवाल तसेच चेतना भारद्वाज यांचा ऑकेस्ट्रा होणार आहे. याखेरीज पर्यटन महोत्सवाचे चारही दिवस फूड फेस्टिव्हल होणार आहे. यामध्ये ७० स्टॉल लावण्यात येणार आहेत. खवय्यांसाठी ही विशेष मेजवानी असणार आहे.






