हळवल फाटा येथे त्या तीव्र वळणाबाबत बाळू मेस्त्री आणि सहकाऱ्यांचे तीव्र आंदोलन | २३ फेब्रुवारीला प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांची संयुक्त बैठक

हळवल फाट्यावर अपघातात मृत्यू झालेल्याना श्रद्धांजली वाहत आंदोलनाची सुरुवात…!

कणकवली : हळवल फाट्यावर अपघाती वळण चुकीचे आहे, त्या काम करणाऱ्या विभागाची जबाबदारी निश्चित करावी, अपघात थाबवेत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांनी ठिय्या आंदोलनाची सुरुवात फाट्यावर झालेल्या अपघात होऊन मृत्यु झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महामार्ग पूर्ण होऊन जवळपास पाच ते सहा वर्ष झाले आहेत. पाच ते सहा वर्षांमध्ये जनतेला नाहक त्रास झालेला आहे. हायवे प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे जनतेला नाहक आंदोलन करावी लागत आहेत.ही खंत माझ्यासारख्या राज्यकर्त्यांला आहे. याचे राजकीय फायदे आम्ही उठवायचे आणि सर्व सामान्य जनतेने आंदोलनाचा पवित्रा हातात घ्यायचा अशा प्रकारचं काम पाच ते सहा वर्षे सुरू आहे. महामार्ग पूर्णत्वात जात असताना या मार्गावर सातत्याने अपघाताची मालिका सुरू आहे.

अपघातामध्ये निष्पाप लोकांचे बळी या हायवेमध्ये गेलेले आहेत.आणि किती बळी हायवे प्राधिकरण घेणार आहे ? हा प्रश्न जनतेचा हायवे प्राधिकरणाला आहे. हायवे मध्ये गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळालेली नाही.अनेक प्रश्न हायवेच्या निमित्ताने प्रलंबित आहेत. असं असताना सुद्धा हायवे प्राधिकरणाने टोल सुरू करण्याचा डाव सुरू केला आहे. याला सुद्धा पूर्ण विरोध सिंधुदुर्गवाशीयांचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा टोल हा भरणार नाही आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये टोल माफी मिळालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका संपूर्ण जिल्हा वाशीयांची आहे. सातत्याने आजही तो लढा सुरू आहे म्हणून कुठेतरी लोकप्रतिनिधींचा आणि जनतेचा रेटा पाहून हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची टोल वसुली करण्याची हिम्मत झालेली नाही. आणि कधीही आम्ही टोल वसुली करू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने आणि जनतेने घेतलेली आहे, असे संदेश पारकर यांनी सांगितले.

ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने बाळू मेस्त्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे आंदोलन केलं. खरंतर या हळवल फाट्यावर सातत्याने अपघात होत आहेत. इथल्या ग्रामस्थांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या असताना सुद्धा या ठिकाणच्या मागण्यांवर हायवे प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केलं जात आहे आणि पुन्हा या ठिकाणी अपघात झाला की आम्हाला पुन्हा हायवे प्राधिकरणाच्या विरोधात आवाज उठवावा लागतं. आजही तीच परिस्थिती आहे. याच ठिकाणी अनेक अपघात झाल्यानंतर हे अपघात कशामुळे होतात ?याचा अभ्यास प्राधिकरणाने केलेला नाही ? आणि यावर कशा प्रकारच आपण नियंत्रण आणू शकतो ? याचा सुद्धा अभ्यास केलेला नाही ? हे अपघात कशामुळे होतात त्याचा अभ्यास करून या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या गरज आहे, असे संदेश पारकर म्हणाले.

हायवे प्राधिकरणाचा मनापासून निषेध करतो आणि आपण जनतेला किती वेळा या ठिकाणी उपोषण आंदोलन करायला लावणार आहात? प्रत्येक वेळी जनतेनेच उठाव करायचा कॉन्ट्रॅक्टर आणि राजकर्त्यांनी फायदे उठवायचे आणि जनतेने मात्र सातत्याने आंदोलन करायचं हे चित्र या हावेच्या निमित्ताने सातत्याने दिसत आहे. ज्यांची जबाबदारी आहे. त्या अधिकाऱ्याने आणि प्रतिनिधींनी यावर निर्णय घेऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. जर हा महामार्ग लोकांचे सातत्याने बळी घेत असेल तर जिल्ह्यातील जनता सातत्याने विरोध अशाच प्रकारे करत राहणार आहे हा हायवे लोकांच्या फायद्यासाठी झाला की लढण्यासाठी झाला हा प्रश्न जनतेसमोर अजूनही अनुत्तरीत आहे म्हणून माझा ठिय्या आंदोलनाला संदेश पारकर म्हणून आणि शिवसेना म्हणून संपूर्ण पाठिंबा आहे असे शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी जाहीर केले.

२३ फेब्रुवारीला प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांची संयुक्त बैठक

हळवल फाटा येथील तीव्र वळणामुळे सातत्याने होणाऱ्या अपघाताची मालिका रोखण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांच्यासह, टोल मुक्त संघर्ष समिती आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी केले. अखेर ७ तासानंतर मागे घेण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून २३ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संयुक्त बैठक घेऊन यावर उपाययोजना बाबत निर्णय घेण्याचं प्रांताधिकारी कार्यालयाकडून शिरस्तेदार शंकर राठोड यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आजचे हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठींबा मिळाला.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अपघाताच्या मालिका थांबलेल्या नाहीत. विशेष म्हणजे कणकवली शहरा लगतच्या गड नदीपात्रावरील तीव्र वळणावरून येणाऱ्या हळवल फाट्यावर अपघात ग्रस्त होत आहे. गेल्या १९ जानेवारीला झालेल्या खाजगी बस अपघातानंतर या परिसरामध्ये आत्तापर्यंत २३ जणांचे बळी तर शेकडोंनी प्रवासी जखमी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो. त्यामुळे आज सकाळ सकाळी १० वाजल्यापासून विनायक उर्फ बाळू मेस्त्री आणि विविध कार्यकर्त्यांनी एकत्रित येत हे आंदोलनात सुरुवात केली.सुरुवातीच्या तासभरामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक गोळा होत होते. जिल्हा टोलमुक्त आंदोलन समितीचे पदाधिकारी ही साडेअकरा बाराच्या सुमारास आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यानंतर या परिसरात अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर या आंदोलनाची धार वाढत गेली .अखेर सायंकाळी जमलेल्या आंदोलनकर्त्यानी रस्त्यावर येण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी रोखले.

यावेळी प्रांताधिकार्यालयाकडून श्री. राठोड यांनी आंदोलकांना आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, लेखी आश्वासन आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यानंतर सायंकाळी ५ वाजता लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनात नमूद करण्यात आले आहे, की येत्या २३ फेब्रुवारीला कार्यालयामध्ये सकाळी ११:३० वाजता महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रतिनिधी, एकत्रित येऊन जनतेच्या मागण्यांवर नक्कीच विचार करतील. त्यामुळे आजचे आंदोलन स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.

जिल्हा टोलमुक्त समितीचे प्रतिनिधी संजय भोगटे, नितीन वाळके, नितीन म्हापनकरविलास कोरगावकर, शिवसेना नेते संदेश पारकर, बँक संचालक सुशांत नाईक, प्रदीप मांजरेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक करबळेकर, भास्कर राणे, संदीप सावंत, निसार शेख, मिलिंद मेस्त्री, ऍड. प्रसाद करंदीकर, राजू पारकर, प्रमोद मसूरकर, सुशांत दळवी, रुपेश खाड्ये, बाळू पारकर, दिगंबर जाधव, ऍडव्होकेट देसाई, रंजन चिके, विलास गावकर, वृक्षवल्लीचे विजय सावंत, अनुप वारंग आदींसह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.