माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे व अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांची देवगड मध्ये पत्रकार परिषद
कणकवली विधानसभा मतदार संघामध्ये आमदार नितेश राणे यांनी गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाल्यामुळे मागासवर्गीय समाज आमदार राणेंच्या कामावर खूष आहे. त्यामुळे ९९ टक्के समाज हा आमदार नितेश राणेंच्या पाठीशी आहे. राणेंना मतदार संघातून ४५ हजाराहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास माजी पंचायत समितीचे सदस्य अजित कांबळे यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ देवगड आमदार संपर्क कार्यालय येथे माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे व अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. यावेळी मंडळ अध्यक्ष देवदत्त कदम,संघटक शैलेंद्र जाधव,विद्याधर कदम उपस्थित होते. आमदार राणे यांनी देवगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजासाठी चांगले काम केले आहे. मात्र विरोधक अपप्रचार करीत आहेत. मागासवर्गीय वस्तीमधील पायवाटा, रस्ते, बुद्ध विहार यासाठी मदत केली आहे. उबाठाच्या कार्यकर्त्यांनी कोणताही विकास किंवा मागासवर्गीय समाजासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे मते मागण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. आमदार राणे यांनी देवगड पर्यटनाच्या माध्यमातून विकास केला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, नळयोजनेची कामे करून सुमारे ३ हजार कोटींचा निधी खर्च केला आहे. त्यामुळे राणेंचा विजय निश्चित असून ४५ हजाराहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास श्री. कांबळे यांनी व्यक्त केला.
आमच्या समाजातील बहुतांशी विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागली आहेत.त्यामुळे आपला समाज आमदार नितेश राणेंच्या पाठीशी असून यावेळी तिसरा विजय मिळवून ते आपल्या विजयाची हॅट्रिक पूर्ण करतील असा विश्वास यावेळी नामदेव जाधव यांनी व्यक्त केला.