हा प्रकार संविधानाच्या मूळ तत्वांना बाधा पोहचविणारा ; वंचित बहुजन आघाडी व देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने देवगड तहसीलदारांना निवेदन
देवगड (प्रतिनिधी) दि १२ जून २०२४
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मित मंडळ पुणे यांच्यावतीने इयत्ता सहावीच्या पुस्तकातील पहिल्या पानावर भारतीय संविधानाची प्रास्ताविका छापण्यात आली आहे. यामध्ये धर्मनिरपेक्ष शब्द वगळून पंथनिरपेक्ष शब्द छापण्यात आला आहे. हा प्रकार संविधानाच्या मूळ तत्वांना बाधा पोहचविणारा आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेमधील धर्म निरपेक्ष शब्द छापण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, इयत्ता सहावीच्या पुस्तकातील संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द आहे. सन २०२४ पासून संविधान प्रास्ताविकेतील धर्म निरपेक्ष शब्द काढून त्याऐवजी पंथनिरपेक्ष हा शब्द छापण्यात आला आहे. संविधानाची प्रास्ताविका हि संविधानाचा मुळ हेतू दर्शविणारी असून शालेय विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक घडविण्याकरीताच शालेय पाठ्यपुस्तकात छापल्याची सर्व नागरिकांची भावना आहे. सन २०२४ पासून शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकातील संविधानाच्या प्रास्ताविकेतील धर्मनिरपेक्ष शब्द वगळून त्याऐवजी पंथनिरपेक्ष शब्द छापलेला आहे. भारतीय संविधानानुसार भारत देशाचा विशेष असा धर्म नाही. कायद्याने सर्व समान आहेत. मात्र शासन सत्तेचा दुरुपयोग करुन संविधानाच्या मूळ तत्वांना बाधा पोहचवित आहे असे निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी देवगड तहसीलदार संकेत यमकर यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सचिव समिर शिरगावकर, देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर जाधव, सल्लागार विजय कदम, सचिव राजेंद्र मुंबरकर, सहसचिव संजय शिरगावकर, दीपक नाईक, नितेश जाधव, रवींद्र जोगल आदी उपस्थित होते.





