शिवसेनेने जिल्ह्याची मोठी हानी केली : राजन तेली यांचा घणाघात

कणकवली : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव घेण्याची ही पात्रता शिवसेना आमदार वैभव नाईक यांची नाही. सिंधुदुर्गाला खऱ्या अर्थाने मागासले पण, बेरोजगारी देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले. सी वल्ड प्रकल्पाला नामदार नारायण राणे यांनी १३० कोटी रुपये दिले तेव्हा खासदार राऊत, आम. नाईक यांचीच विरोधात भूमिका घेत सत्ता आल्यावर तो प्रकल्प रद्द केला. चिपी विमानतळाला नाम. नारायण राणे यांनी मंजुरी आणली, निधी आणला तर खासदार राऊत, आमदार नाईक, यांनी विमानतळाला विरोध केला. आंदोलने केली आणि नंतर उदघाटनाला टेंबा मिरवला. नानार ग्रीन रिफायनरी ला विरोध करणारे सुद्धा हेच लोक आहेत. पर्यटन दृष्ट्या पंचतारांकित हॉटेल जिल्ह्यात आणली त्यालाही शिवसेनेने विरोध केला.या विरोधामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा मागे पडला आणि सत्तेच्या अडीच वर्षात येथील जनतेला कोणताच फायदा उद्धव ठाकरे सेना मिळवून देवू शकली नाही. सत्तेत असताना खासदार राऊत आणि आमदार नाईक अपयशी ठरले हेच पूर्ण सत्य आहे. आणि त्यामुळेच शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्वात मोठी हानी केलेली असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.

कणकवली येथील आयोजित परिषदेत आमदार नाईक यांच्या वक्तव्यांचा तेली यांनी चांगलाच समाचार घेतला. राजन तेली म्हणाले आनंद उत्सव मेळाव्यामुळे जर भक्त – भाविक, जनता यांची गैरसोय झाली असेल तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सर्व जनतेची दिलगिरी व्यक्त करतो. मात्र या मेळाव्यात कोणताही राजकीय रंग नव्हता. भविष्यात कोणत्याही निवडणुका जिल्ह्यात नसतानाही आम्ही लोकप्रतिनिधी यांना भराडी देवीच्या दर्शनानिमित्त एकाच व्यासपीठावर, एकत्रित आणण्याच्या हेतूने आणि भराडी आईच्या आशीर्वादाच्या इच्छेने हा मेळावा घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे तेली म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षे सत्तेत असताना ज्या विकासाच्या संधी होत्या त्या त्यांनी गमावल्या. आजही भारतीय जनता पार्टी जलद गतीने विकास करत आहे. ते पाहिल्यानंतर वैभव नाईक यांना विकासाचे आकलनही होणार नाही,एवढ्या गतीने तो होत जाईल. राष्ट्रीय महामार्ग आम्ही केला. मेडिकल कॉलेज तुम्ही केलात. मात्र मेडिकल कॉलेजची काय स्थिती आहे ? शिक्षण देणारे डॉक्टर तरी आहेत काय ? कॉलेज करताना काय तरतुदी केलात हे एकदा तपासून पहा.
अडीजशे कोटीचा जिल्हा विकास आराखडा होता. तो १७० कोटीवर तुम्ही आणून ठेवला. आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ३०० कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे. तो मंजूर करून सिंधुदुर्गाला निधी मिळेल तेव्हा तुम्हाला कळेल की भारतीय जनता पार्टी किती जलद गतीने विकास योजना राबवत आहे.

आंगणेवाडी भराडी देवीचा जत्रोत्सवात जी व्यवस्था रस्ते शौचालय उभी केली. हे काम आज पर्यंत शिवसेना करू शकलेले नाही. त्यामुळे अपघाताने आमदार झालेल्या वैभव नाईक यांनी आत्मपरीक्षण करावे. आज शिवसेनेत एकटेच राहिले असले तरी सुद्धा त्यांना काही पद मिळालेले नाही.सत्ता आली तेव्हा पालकमंत्री पण झालेले नाही.शेवटी अभ्यास लागतो, प्रामाणिकपणा लागतो, तो त्यांच्यात नाही. ते आमच्या ज्या नेतृत्वावर टीका करतात ते राणे साहेब राज्याचे मुख्यमंत्री, केंद्राचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि नेतृत्वाची वैभव नाईक बरोबरी सुद्धा करू शकत नाही असे शब्दात यावेळी राजन तेली यांनी त्यांना सुनावले.