कणकवली : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. अखंड लोकमंच, कणकवली यांच्या वतीने व नगरपंचायत कणकवली यांच्या सहयोगाने प्रवीण बांदेकर यांचा नागरी सत्कार आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये हा सत्कार होणार आहे. माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते या नागरी सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. इन गोवा २४×७ चे संपादक प्रभाकर ढगे, मराठीतील महत्त्वाचे कवी वीरधवल परब, कवी समीक्षक प्रा. डॉ.गोविंद काजरेकर, प्रा.डाॅ. शरयू आसोलकर, कवी अनिल धाकू कांबळी, कवी मोहन कुंभार व अखंडचे नामानंद मोडक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
प्रवीण बांदेकर हे आघाडीचे समकालीन साहित्यिक आहेत. या आधी सिंधुदुर्गातील वि.स. खांडेकर, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, सतीश काळसेकर, जयंत पवार अशा मोजक्याच साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यांच्या सोबत आता नाव जोडले गेलेले प्रवीण बांदेकर हे सिंधुदुर्गात राहून लेखन करणारे व हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिलेच साहित्यिक आहेत.
उजव्या सोंडेच्या बाहुल्या या मराठीतील महत्त्वाच्या कादंबरीसाठी प्रवीण बांदेकर यांना हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. असून सांस्कृतिक अस्मितांच्या अतिरेकामुळे सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. प्रेरणा देणारा महत्त्वाचा पुरस्कार असल्याने त्यांचे नागरी सत्कारातून अभिनंदन करून त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा देण्यासाठी कणकवलीकरांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे;असे अखंडचे नामानंद मोडक , राजेश कदम व विनायक सापळे यांनी सांगितले.





