मोदींच्या फसव्या गॅरंटीमुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव निश्चित
विनायक राऊत यांनी फुंकले लोकसभा प्रचाराचे रणशिंग
कणकवली (प्रतिनिधी) दि ५ मार्च २०२४
सध्या मोदी गॅरंटीचा जमाना चालला आहे. मात्र, याच गॅरंटीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अडिच लाख मतांनी पराभूत होईल, आमची महाविकास आघाडी आता पुरतीच नाही तर लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत ती कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करुया, कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही मी कार्यरत राहीन. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.
कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत खासदार विनायक राऊत यांच्या ‘लेखा जोखा’ या कार्यहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, सतीश सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जान्हवी सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत, अतुल रावराणे, संग्राम प्रभुगावकर,भाई गोवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, रेवती राणे, अर्चना घारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे,नागेश मोरये, सायती पाटकर, नितिषा नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
खासदार राऊत पुढे बोलताना म्हणाले की,राज्य आमच्या लोकांवर अवलंबून आहे. त्यामुळे आधी गोवा उभारा आणि मग सिंधुदुर्गात या. महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांनी बेसावध आणि बेफिकीर राहू नये, प्रत्येक घराघरात जावून आपला विचार पोहचवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, नितेश राणे यांच्या भावाने गुहागर येथील सभेत सर्व विखार बाहेर टाकला. त्या व्यासपीठावर महिला होत्या. तरीही त्याचे भान राखले नाही.
प्रमोद जठार तुम्ही रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली जमिनीचे कमिशन घेवून जनतेला फसवण्याचे काम केले. त्याला रोखणारा मी खलनायक आहे. तुम्ही किती शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे दिले नाहीत? ते जनतेला सांगा. दिल्लीत माझा बंगला नाही, तुमचे सर्वाचे घर आहे. या विनायक राऊत यांची गेल्या १० वर्षात वडिलो पर्जित जमिनीपेक्षा किती जमीन वाढली आहे. ते मला दाखवावे. तसेच वाढलेली जमीन राणे कुटुंबीयांनी घ्यावी.
मंत्रीपद भोगूनही उदय सामंत यांना शक्य झाले नाही ते आम्ही करून दाखवले. आंबोली येथे २७ बंगले कायदा भंग करत बांधले आहेत. त्याबाबत विचारणा केली नाही. त्यामुळे आंबोलीतील त्या ठिकाणी दीपक केसरकर गेले तिथे त्यांना ग्रामस्थांकडून प्रसाद मिळाला. प्रमोद जठार यांनी माझा लेखा जोखा चष्मा लावून वाचावा. त्यामुळे मी काय केले ते त्यांना समजेल.
विकास सावंत म्हणाले, खा. राऊत केव्हाही शिवराळ भाषा वापरत नाहीत. संस्कृती आणि संस्कार त्यांच्यामध्ये आहेत, विरोधकांनी टोकाची टीका केल्यानंतर पण ते त्यांच्याशी चांगलेच वागत आहेत. मोदींना सकाळी उठल्यावर प्रथम काँगेसच ‘दिसत आहे. अबकी बार ४०० पार ही भाजपची घोषणा अत्यंत घातक आहे. भाजप मधील ७७ खासदार हे मूळ काँगेसचे आहेत. ते संधीसाधू आहेत.





