मडूरेत पोट कालवा खोदाईचे काम संतप्त शेतकऱ्यांनी रोखले
रोणापाल ४३ किमी दरम्यान पाणी येईपर्यंत कामे करू न देण्याचा इशारा
बांदा : (मंगल कामत)
तिलारी कालव्याला पाण्याचा पत्ता नसतानाही पोट कालव्याची कामे मात्र वेगाने सुरू असल्याने मडूरा पंचक्रोशीतील ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेतली. मडूरा चवडीवाडी येथील खोदाईचे काम संतप्त ग्रामस्थांकडून रोखण्यात आले. रोणापाल ४३ किमी पर्यंत जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत पोट कालव्याची कामे करू देणार नाही. नपेक्षा शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आमच्यावर गुन्हे दाखल करा अशी उद्विग्न मागणी शेतकऱ्यांनी केली. जलसंपदा विभाग शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला.
तिलारी कालव्याचे पाणी रोणापाल गावापर्यंत सोडण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांचा तिलारी विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. चार दिवसांपूर्वीच कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. मात्र, कालव्याची दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे कारण पुढे करत त्यांनी पाणी सोडण्यात असमर्थता दाखवली. त्यामुळे मडूरा दशक्रोशीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाण्या अभावी नवीन बागायती लागवडी मरून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तिलारी कालव्याला पाणी नसतानाही पोट कालव्याची कामे मात्र जोरात सुरू आहेत. यासाठी शेती योग्य जमिनीत खोदाई करून जमीन नापीक करण्याचे प्रकार सुरू आहेत.
तिलारी मुख्य कालव्याला ४३ किमी पर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत पोट कालव्याची कामे न करण्याच्या सूचना शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला दिली होती. असे असतानाही सोमवारी चवडीवाडी भागात जेसीबीच्या सहाय्याने खोदायचे काम सुरू होते. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व काम रोखण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका. कायदा हातात घेण्याची पाळी येऊ देऊ नका अशी तंबी यावेळी ठेकेदार कंपनीला देण्यात आली.
पोट कालव्याचे काम रोखण्यात आले. शासकीय कामात अडथळा आणला. याबाबतची तक्रार पोलिसात करा व आमच्यावर गुन्हे दाखल करा अशी उद्विग्न मागणी शेतकऱ्यांनी केली. कालव्याला ४३ वर्षे झालीत. मात्र पाणी नाही. शेतकऱ्यांच्या अंताची वाट पाहता का ? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. ठेकेदार कंपनीने काम बंद ठेवण्याची हमी दिली.
यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, मडूरा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, कास सरपंच प्रवीण पंडित, श्रीकांत पंडित, अरुण पंडित, नारायण धुरी, आजो परब, सुकाजी मोरजकर, प्रकाश पंडित, बाबली मोरजकर, सागर गोठासकर, गोपाळ धुरी, सुशांत मोरजकर, राजन पंडीत आदी उपस्थित होते.






