कौतुकास्पद… चिपळुणच्या दोन सुकन्यांनी सायकलने पूर्ण केला स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंतचा आव्हानात्मक प्रवास…!

सावंतवाडी : चिपळुणातील दोन सुकन्यांनी तब्बल 800 किमीचे अंतर सायकलने पार करत गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंतचा आव्हानात्मक प्रवास तीन दिवसात पूर्ण केला. इतका दूरच्या अंतराचा प्रवास सायकलने करणाऱ्या कोकणातील या दोघीजणी पहिल्याच सायकल प्रवासी असून त्यांच्या या धाडसाचे जिल्हाभरातून विशेष कौतुक होत आहे.

चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्य असणाऱ्या धनश्री गोखले व डॉ. आश्वनी गणपत्ये यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तसे पाहिल्यास ठाणे ते अहमदाबादच्या दिशेने जाणारा हा एक्स्पेस हायवेलगत असून त्यावरुन भरधाव वेगात जाणारी वाहने, शिवाय बोचरी थंडी आणि सततची वर्दळ अशा स्थितीत गोखले व गणपत्ये यांनी 21 जानेवारी रोजी ‘स्टच्यू ऑफ युनिटीच्या दिशेने सायकलने प्रवास सुरू केला. त्यांचा खरा प्रवास ठाण्यातून सुरु झाला.

दररोज त्या दीडशे किमीचे अंतर सायकलने पार करत ठाणे – वापी – अंक्लेश्वर त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी अशा टप्प्यात त्यांच्या प्रवासाचे नियोजन होते. अखेर तीन दिवसांनी अथक प्रयत्नानंतर 23 जानेवारी रोजी त्या स्टॅच्यू ऑफ युनिटी याठिकाणी जाऊन पोहोचल्या.

धनश्री गोखले यांनी यापूर्वी अहमदाबाद एक्स्प्रेस हायवेवरुन सायकलने प्रवास केल्याने तो अनुभव त्यांच्याजवळ होता. स्टच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचल्यावर धनश्री गोखले व डॉ. आश्विनी गणपत्ये यांच्या चेहऱ्यावर आपले ध्येय गाठल्याचे अनोखे समाधान सहाजिकच उमटले.

त्यानंतर पुन्हा त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाल्यानंतर त्या दोघी चिपळुणात येताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तब्बल 800 किमीचे अंतर त्यांनी सायकलने पार केले. दरम्यान, धनश्री गोखले यांनी सांगितले की, स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलने जाण्याचा प्रवास अनुभव अभूतपूर्व होता.