CRIME – विवाहविषयक संकेतस्तळावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर अत्याचार.! ; २६ लाखांचीही केली फसवणूक.

87

पुणे : विवाह नोंदणी (मॅट्रिमोनिअल) संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीवर अत्याचार आणि २६ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने व्यवसायात तोटा झाल्याची बतावणी करून तरुणीला बँकेकडून कर्ज काढण्यास भाग पाडले. त्यानंतर कर्जाच्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी अमित चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपी चव्हाण याने रोहित राजाराम देशमुख या नावे विवाह नोंदणी संकेतस्थळावर माहिती दिली होती.

आयात-निर्यात व्यवसाय असल्याचे त्याने संकेतस्थळावरील माहिती नमूद केले होते. त्यानंतर तरुणी आणि आरोपी चव्हाण संपर्कात आले. चव्हाण याने तिला विवाहाचे आमिष दाखवून भेटायला बोलावले. त्याने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तरुणीची छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने तरुणीवर पुन्हा अत्याचार केला. आयात-निर्यात व्यवसायात मोठा तोटा झाल्याचे सांगून त्याने तिला कर्जप्रकरण करण्यास सांगितले. तरुणीने एका बँकेकडून २६ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढून चव्हाणला दिले. कर्जाचे हप्ते मी भरतो, असे त्याने तिला सांगितले होते.

चव्हाणने हप्ते न भरल्याने तिने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा समाजमाध्यमात छायाचित्रे, तसेच ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. कोंढवा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.